पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरवात केल्याचं पहायला मिळतंय. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी देण्याच्या चर्चेत जवळपास तथ्य असल्याचंही चित्र स्पष्ट होत आहे. त्यातच आज अजित पवार यांनी बारामती बारामतीत अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळावा आयोजित केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
घरातले सगळे माझ्या विरोधात गेले पण तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण एवढं सगळं इतरांसाठी करुन जीवाचं रान करुन कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हीच बघा, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार गटाला टोला लगावला आहे.
“संसदेत भाषणं करुन प्रश्न सुटत नाहीत”
मी आधीच व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात सांगितलेलं आहे. मी देशपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवत आहे. उद्या जाऊन माझ्या विचाराच्या उमेदावराला काही डाग लागला तर देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात माझी किंमत कमी होईल. फक्त व्यक्ती निवडणून देऊन, संसदेत भाषणं करुन प्रश्न सुटत नाहीत. मी इथं न येता मुंबईत बसून भाषणं करुन उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता तर इथली कामं झाली असती का?, असा सवाल करत अजित पवारांनी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंना खोचक टोला लगावला आहे.
अवघ्या काही दिवसांत लोकसभेची निवडणूक जाहीर होईल. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन मार्च रोजी 5 जिल्ह्यांचा ‘नमो रोजगार मेळावा’ बारामतीमध्ये होणार आहे. त्यासाठी आपल्या परिसरातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. आपल्या राष्ट्रवादीसोबत भाजप आणि शिवसेना शिंदेंची तसेच इतर घटक पक्षही आहेत. आपली घड्याळ तेच आहे फक्त वेळ नवी आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात?
काही लोक म्हणतील त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. पण लक्षात ठेवा आणि त्यांना सांगा त्या जरी पहिल्यांदा निवडणूक लढवत असल्या तरीही त्यांच्या आजूबाजूला काम करणारी लोक ६-६, ७-७ वेळा निवडून गेलेत हे त्यांना सांगा. भावनिक होऊ नका, असं म्हणत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता!
अवघ्या काही दिवसांत लोकसभेची निवडणूक जाहीर होईल. माझ्या अंदाजे साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता निश्चित करतील. मी २ मार्चला पुणे विभागाला नमो रोजगार मेळावा हा ५ जिल्ह्याचा बारामतीमध्ये ठेवला आहे. सकाळी ९ ते संध्याकाळपर्यंत चालणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मनोज जरांगेंची प्रकृती गंभीर; आक्रमक आंदोलकांकडून पुण्यात ठिकठिकाणी चक्काजाम
-‘घर वडिलांच्या नावावर असताना तुम्ही वडिलांना घराबाहेर काढणार का तुम्ही?’; सुळेंचा दादांना टोला
-कुलकर्णी राज्यसभेवर तर लोकसभेसाठी मुळीकांच्या आशा पल्लवीत; काय असेल भाजपचा निर्णय?
-लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांची जय्यत तयारी; शहरात फिरु लागला ‘विकासरथ’
-‘संघर्षाच्या वेळी त्यांची आठवण येते’; आर. आर. आबांच्या स्मृतीदिनी सुप्रिया सुळे भावूक