पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलहानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षचिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला दिले. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनीही त्याच धर्तीवर निकाल दिला आहे. गुरुवारी १५ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीदेखील याबाबत दिलेल्या निकालामध्ये अजित पवार गटालाच मूळ राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचाही निकाल शिवसेनेच्याच निकालाप्रमाणे लागल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांवर विषेशत: भाजपवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यावर राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
‘तुमचं घर वडिलांच्या नावावर असतं. वडिलांना घराबाहेर काढणार का तुम्ही? आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे संस्कार घेऊन पुढे चाललो आहोत. त्यांनी वडिलांसाठी १४ वर्षांसाठी वनवास भोगला. त्या रामाचे संस्कार आमच्यावर झाले आहेत. त्यामुळे ज्येष्ठांचा सन्मान करणं हे संस्कार आमच्यावर झाले आहेत. माझ्या आई-वडिलांचं लग्नही रामाच्या मंदिरातच झालं आहे’, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. याच मतदारसंघातून अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात आपला उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंना विचारणा केली असता त्यावर त्यांनी ही आपली वैचारिक लढाई असल्याचं सांगितलं आहे.
‘मला माहिती नाही. माझी लढाई वैयक्तिक कुणाशीही नाही. माझी ही वैचारिक लढाई आहे. लोकशाहीत ही लढाई केलीच पाहिजे. त्यात गैर काय?’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘माझा स्वभावच हक्क दाखवण्याचा नाहीये. हक्क दाखवण्यात काय मजा आहे. लोकांचं प्रेम मिळवण्यात जास्त मजा असते.’
महत्वाच्या बातम्या-
-कुलकर्णी राज्यसभेवर तर लोकसभेसाठी मुळीकांच्या आशा पल्लवीत; काय असेल भाजपचा निर्णय?
-लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांची जय्यत तयारी; शहरात फिरु लागला ‘विकासरथ’
-‘संघर्षाच्या वेळी त्यांची आठवण येते’; आर. आर. आबांच्या स्मृतीदिनी सुप्रिया सुळे भावूक
-मेधा कुलकर्णींच्या राज्यसभेमुळे मोहोळांचा मार्ग मोकळा, नेमकं गणित काय?
-बारामती मतदारसंघातून महत्वाची अपडेट; सुनेत्रा पवार कांचन कुल यांच्या भेटीला