पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती तालुक्यातील सर्व गावांमध्ये अनेक उपक्रम राबवताना नेहमी पहायला मिळतात. त्या नेहमी महिला कार्यक्रम राबवत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजई एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात दिसणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणुकीसाठी उमेदवार राहिलेल्या भाजपच्या कांचन कुल यांची भेट घेतली.
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच लोकसभेसाठी उमेदवार राहणार असल्याचे अनेक पोस्टर्सही बारामती शहरात झळकत आहेत. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ शहरात फिरत आहे. त्यामुळे बारामतीत आता नणंद-भावजईच्या लढतीचे स्पष्ट संकेत आहेत.
बारामती लोकसभेसाठी अजित पवार उमेदवार कोण देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामतीतील अजित पवार गटाकडून कोणता उमेदवार असणार लोकसभेची गणितं अवलंबून आहेत. अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभी करावी, असं भाजपच्या नेतृत्वाला अपेक्षित आहे. त्यासोबतच बारामतीतील अजित पवारांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचीदेखील हीच इच्छा असल्याचं दिसून येतं. त्याच दिशेने अजित पवार पावलं टाकताना दिसत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी वीरधवल जगदाळे यांनी केली होती. वीरधवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यंच्याकडे पत्राद्वारे केली होती.
सुनेत्रा पवार यांनी आजपर्यंत कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. त्यांचा पर्यावरणाशी आणि महिलांशी संबंधित कामात महत्वाचा सहभाग राहिला आहे. त्या वेगवेगळ्या माध्यमातून सामजिक कामे करतात. मात्र निवडणुकीच्या रिंगणात त्या पहिल्यांदाच उतरणार असल्याचे संकेत अजित पवार गटाकडून देण्यास सुरुवात झाल्याचं पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘संघर्षाच्या वेळी त्यांची आठवण येते’; आर. आर. आबांच्या स्मृतीदिनी सुप्रिया सुळे भावूक
-मेधा कुलकर्णींच्या राज्यसभेमुळे मोहोळांचा मार्ग मोकळा, नेमकं गणित काय?
-बारामती मतदारसंघातून महत्वाची अपडेट; सुनेत्रा पवार कांचन कुल यांच्या भेटीला
-रक्षकच बनले भक्षक; गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पोलिसांनी उकळले पैसे