पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दोन गट पडले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपुर्वीच राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे अजित पवार यांच्या गटाला दिल्याचा निर्णय दिला आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असून खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत पहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. म्हणजेच नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असतानाच सुनेत्रा पवार यांना विजयी करावं, अशा आशयाचा आणि अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो असलेले काही बॅनर्स बारामती शहरात लागले आहेत.
अजित पवार, सुनेत्रा पवार यांचे फोटो असलेले फलक काऱ्हाटी गावात एका शेती फार्मच्या मालकाने लावला होता. या फलकावर फलकावर अज्ञात समाजकंटकाने शाईफेक केल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत ही शाईफेक झाल्याचं सकाळी समोर आलं. शाईफेकीच्या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान फलकावर शाई फेकल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी संबंधित फलक उतरवला आहे.
काऱ्हाटी गावात लावण्यात आलेल्या या फलकावर सुनेत्रा पवार यांचा ‘भावी खासदार’ असा उल्लेख करण्यात आला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या फलकावर अजित पवार यांचा देखील फोटो वापरण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या-
-वागळे प्रकरणाच्या हल्लेखोरांची परेड का काढली नाही? राऊतांचा राज्य सरकारला सवाल
-शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससूनमधून फरार; पोलीस दलात खळबळ
-पुण्यात पुन्हा एकदा थाडथाड; आधी मित्रावर गोळीबार पुन्हा स्वतःला संपवलं
-वागळे हल्ला प्रकरण: भाजपचे दीपक पोटे, बापू मानकरांसह १० जणांना पोलिसांनी केली अटक
-‘पक्ष म्हणून आम्ही तुमच्या पाठिशी’; निखिल वागळेंना समर्थन देणारा नेता कोण?