पुणे : राज्यात एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे. तर एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये कलगितुरा रंगला आहे. अशातच ओबीसी आरक्षणाच्या बाबत अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका घेतली आहे. ‘ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये’, असं छगन भुजबळ वारंवार सांगत आहेत.
छगन भुजबळांच्या या भूमिकेवर अनेक स्तरातून टीका केली जात आहे. सत्तारुढ पक्षाच्या एका आमदाराने भुजबळ यांच्यावर टीका करताना निषेधार्य वक्तव्य केले आहे. याबाबत आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता भाष्य केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षा’चा आज पुण्यातील हडपसरमध्ये मेळावा होत आहे.
“सत्तेत असणारे एक आमदार म्हणतात छगन भुजबळांच्या पेकाटात लाथ मारुन बाहेर काढलं पाहिजे, अशी भाषा वापरली जाते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काही बोललले आपल्याला आठवतं का? भुजबळांबद्दल असे बोलले जात आहे. आम्हाला वाईट वाटतंय. पण ते बाहेर का पडत नाहीत, हे कळत नाही. अशी वक्तव्य करणाऱ्यांना मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री त्या आमदारा काढून टाकणं, त्यांच्यावर योग्य कारवाई करणं, समज देणं अशा साध्या गोष्टी देखील का करत नाहीत?”, असे जयंत पाटील मेळाव्यात बोलाताना म्हणाले आहेत.
“मला खरंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. गृहमंत्री म्हणून ते काहीतरी ठोस कारवाई करतील अशी माझी अपेक्षा होती. ज्या भुजबळांबद्दल एक आमदार काय भाषा वापरतो. पण त्याला मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री काही बोललेत का? की बाबारे तू असं का बोलतोस म्हणून…?”, असा थेट सवाल करत जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत.