पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवारांच्या गटाला निवडणूक आयोगाच्या निकालात पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दिल्यानंतर राज्यभरात शरद पवार गटामध्ये संतापाची लाट उसळली आहे. अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाचे नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर आपला हक्क गाजवत आहेत. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाद आता विकोपाला पोहचला आहे. परिणामी या पक्ष कार्यालयाला पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा भाडेकरार हा शरद पवार गटाचे शरहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावावर आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यावर पुण्यातील पक्ष कार्यालयावर दावा करण्यात येत आहे. पक्ष कार्यालयाच्या कोनशीलावरील अजित पवारांचं नाव दगडाने फोडून काढलं. त्यावर बोलताना अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी इशारा दिला आहे. अजित पवारांचा विश्वासघात केला असल्याचा गंभीर आरोप मानकरांनी केला आहे.
दीपक मानकर काय म्हणाले?
‘प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या नावाने भाडेकरार न करता स्वत:च्या नावाने केला आहे. त्यांनी अजितदादांचा विश्वासघात केला आहे. तो करार आता संपला आहे. आधी ऑफिस टिकवून ठेवा मग तोडफोड करत बसा. तोडफोड आम्हालाही नविन नाही. आम्ही संयमाने वागतोय याचा अर्थ असा नाही की आम्ही तुमच्या सर्व गोष्टी सहन करू.’
‘शिल्लक राहिलेले नगरसेवक पकडून ठेवा. नाहीतर तेही पळून जातील. काहीही शिल्लक राहणार नाही. अनेकांचा ओघ आमच्याकडे आहे. काल झालेल्या निर्णयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादाच आहेत. आणि पक्षाचे नाव, निवडणूक चिन्हही आम्हालाच मिळाले आहे. पहिले पक्ष चिन्ह ठरवा आणि मग बाकीचे उद्योग करा’, असं म्हणत मानकरांनी इशारा दिला. त्यावर आता प्रशांत जगतापही आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत.
काय म्हणाले प्रशांत जगताप?
“गुंडगिरी करून कार्यालय बळकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याकडून ताबा मिळवण्याची वक्तव्य वारंवार कानी पडत आहेत”, असं म्हणत प्रशांत जगताप यांनी दीपक मानकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.