पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरात भरदिवसा कोयता गँग आपली भाईगिरी दाखवतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील अनेकदा समोर आले आहेत. नुकतेच कुख्यात गुंड शरद मोहळची हत्या दोन गँगमधील वादामुळे घडली. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे विरोधकांनी पोलीस आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. आता पुणे शहराच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी दबंग अधिकारी म्हणून ओळख असणारे अमितेश कुमार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सलग २ दिवस सर्व गुंडांना एकत्र बोलावून सज्जड दम दिला. मात्र पुणे पोलिसांच्या आदेशाला ‘भाई लोकांच्या’ कार्यकर्त्यांनी केराची टोपली दाखवली आहे. पुणे पोलिसांचे आदेश गुंडांनी डावलल्याचं स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे.
गुन्हेगारांच्या परेड नंतरही पुण्यात गुंडांची सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स व्हायरल करण्याचा प्रकार सर्रासपणे सुरु आहे. गुन्हेगार, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स व्हिडीओ गुंडांनी, गुंडांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट करायचे नाहीत, अशी सक्त ताकीद पोलिसांनी दिली होती.
View this post on Instagram
पुणे पोलिसांनी हे जाहीरपणे सांगून काही तास उलटायच्या आतच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गुंड निलेश घायवळ याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड केल्याचे पहायला मिळाले आहे.