पुणे : उल्हासनगर येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादाय घटना घडली होती. विशेष म्हणजे हा प्रकार पोलिस स्टेशन मध्येच घडल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेचा UBT गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे गुंडांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.
राज्यातील गुन्हेगारांना सरकारकडून अभय दिले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी कुख्यात गुंड निलेश गायवळचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चा फोटो राहू त्यांच्याकडून पुढे आणण्यात आला होता. यानंतर मोठा वाद निर्माण झालेला असतानाच आता ठाणे आणि पुणे शहरात गुन्हे दाखल असलेल्या दीपक सपके सोबतचा फोटो राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. संबंधित फोटोमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी आणि ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश करणारे भाऊसाहेब आंधळकर हे देखील दिसत आहेत.
“शिंदे गँग च्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा..
ठाणे पुणे परिसरात हत्या,अपहरण,सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे..अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत! पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महातम्याची माहिती जाहीर करावी!
गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य” असा आरोप राऊत यांनी यावेळी केला आहे.