पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरात भरदिवसा कोयता गँग आपली भाईगिरी दाखवतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. नुकतेच कुख्यात गुंड शरद मोहळची हत्या दोन गँगमधील वादामुळे घडली. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे विरोधकांनी पोलीस आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. आता पुणे शहराच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी दबंग अधिकारी म्हणून ओळख असणारे अमितेश कुमार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
नव्याने पदभार स्विकारल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पहायला मिळत आहेत. अमितेश कुमार यांनी पुणे शहरात ‘क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट’ स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील कुख्यात गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेत ‘क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट’ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
कुख्यात गुंड, रेकॉर्डवरील आणि झोपडपट्टी परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस ठाणे आणि पोलीस चौक्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. गेली सलग दोन दिवस शहरातील कुख्यात गुन्हेगारांची परेड देखील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली आणि सर्व गुंडांना सज्जड दमही भरला.
“गुन्हेगारांबद्दल कडक कारवाई होणार आहे. नुसती अटक नाही तर कडक कारवाई देखील केली जाते, हे दाखवण्यासाठी परेड घेतली गेली. पुणे शहर गुन्हेगारीमुक्त करण्याचा आमचा उद्देश आहे. कायदा कुणी हातात घेऊ नये, ही सूचना सर्व गुंड आणि गुन्हेगारांनी दिल्या आहेत. अन्यथा त्यांची खैर राहणार नाही. सोशल मीडियावर हिरो दाखवण्याचा कुणाचा प्रयत्न असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे”, असे अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.