पुणे: शेकडो वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत राममंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या निमित्ताने देशभरासह पुणे शहरात देखील कार्यक्रमांची मांदियाळी पहायला मिळाली. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजप नेत्यांनी ‘अपने अपने राम’ म्हणत जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे (Friends of BJP) सह संयोजक शिवाजी माधवराव मानकर (Shivaji Madhavrao Mankar) यांच्यातर्फे महालक्ष्मी लॉन्समध्ये महाआरतीचा सोहळा पार पडला. यावेळी शहरभरातील मान्यवरांसह पुणेकरांची मोठी गर्दी करत एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याचं दिसत आहे.
शिवाजी मानकर यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीच्या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह राजकीय, सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. शहरातील प्रत्येक घटकातील प्रमुख व्यक्तींना निमंत्रित करत यानिमित्ताने त्यांच्याशी जोडले जाण्याच्या प्रयत्न करण्यात आल्याचं दिसत आहे. गायक हेमंत ब्रिजवासी यांची रामगीते, शंखनाद, गंगा घाटावरील महाआरती या सगळ्याला उजळवून टाकणारी विद्युत रोषणाई अन फटाक्यांची आतषबाजी, अशा सोहळ्यातून श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव यावेळी साजरा करण्यात आला.
दोन दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवाजी मानकर यांनी आपण भाजपकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं जाहीरपणे सांगितल होते. मानकर यांच्याकडून संपूर्ण पुणे शहरात जवळपास चारशे फ्लेक्स यानिमित्ताने उभारण्यात आले. तर रामलल्लाच्या महाआरती सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केल्याचं बोललं जात आहे.