लोकसभा निवडणुक जशी जवळ येत आहे, तसे सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. पुणे लोकसभा (Pune Loksabha) मतदारसंघात गेली दोन टर्मपासून भाजप (BJP) उमेदवारांचा विक्रमी मतांनी विजयी झालेला आहे. यावेळी देखील भाजपसाठी पोषक वातावरण असल्याची चर्चा असल्यानेच भाजपमध्ये इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता 2014 साली येवला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढणारे शिवाजी माधवराव मानकर (Shivaji Mankar) हे देखील पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं पुढे आलं आहे. स्वतः मानकर यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल जाहीरपणे इच्छा व्यक्त केली.
22 जानेवारी रोजी आयोध्या येथे भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून या निमित्ताने पुणे शहरात देखील भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. भाजपकडून इच्छुक असणारे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी संघ प्रचारक सुनील देवधर यांच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिवाजी मानकर यांनी देखील डीपी रोडवर असणाऱ्या महालक्ष्मी लॉन्स येथे महाआरतीचे आयोजन केले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मानकर यांनी आपण भाजपकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं जाहीरपणे सांगितल आहे. मानकर यांच्याकडून संपूर्ण पुणे शहरात जवळपास चारशे फ्लेक्स यानिमित्ताने उभारण्यात आले आहेत.
दरम्यान, मानकर यांच्याकडून पुणे लोकसभेसाठी दावा करण्यात आल्याने आता भाजपमध्ये इच्छुकांची भली मोठी यादी दिसत आहे.
नेमके कोण आहेत शिवाजी मानकर?
मूळ पुण्यातील नारायण पेठ येथील असणारे शिवाजी मानकर हे गेल्या काही वर्षांपासून नाशिक येथे स्थायिक आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये भाजपामध्ये त्यांचे सक्रिय काम आहे. २०१४ साली भाजपच्या उमेदवारीवर येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या विरोधात लढत. विशेष म्हणजे शिवाजी मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष असणारे दीपक मानकर यांचे बंधू आहेत. प्रगतशील शेतकरी म्हणून देखील त्यांची ओळख आहे. भारतीय जनता पार्टीच्या ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ अभियानाचे ते प्रदेश सहसंयोजक देखील आहेत.