पुणे: पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात भाजपचे माजी नगरसेवक श्रीकांत जगताप यांच्यासह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २०१२ साली पोस्ट खात्याची सरकारी रक्कम वाहणाऱ्या गाडीवर सुरक्षा रक्षक म्हणून बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी अमित पवार (वय ४५) यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी जगताप यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोस्ट खात्याची रोकड वाहतुकीसाठी असणाऱ्या सरकारी गाडीवर पोलीस कर्मचारी अमित पवार हे सुरक्षारक्षक म्हणून बंदोबस्तावर होते, ४ जून २०१२ रोजी हिंगणे खुर्द पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी गाडी घेऊन आले असताना पार्किंग करण्याच्या कारणावरून बंदोबस्तावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जमावाकडून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी भाजपाचे नगरसेवक श्रीकांत जगताप यांच्यासह अनिकेत राजेंद्र जगताप, हेमंत रत्नाकर जगताप महेश आनंदराव काटे, जयनाथ वसंतराव जगताप व शैलेश सोनबा चव्हाण सर्व रा. हिंगणे खुर्द,सिंहगड रोड यांच्यावर पोलिस कर्मचारी यांना मारहाण, शिवीगाळ व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या वतीने ॲड.मिलिंद पवार यांनी न्यायालयात बाजू मांडली.
दरम्यान, घटनेच्या वेळी दहा ते पंधरा अनोळखी इसमांनी पोलिस कर्मचारी पवार यांना मारहाण केली. त्यामुळे घटनास्थळी झालेल्या गर्दीमध्ये नेमकी मारहाण कोणी कोणाला केली हे सांगता येणार नाही. घटना स्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी न्यायालयासमोर आणलेले नाहीत. पोलिस कर्मचारी यांचा फाटलेला खाकी शर्ट न्यायालयात पोलिसांनी जमा केलेला नाही. पोलिस कर्मचारी यांना मारहाणीत झालेल्या जखमांचे वैद्यकीय प्रमाणपत्र पोलीसांनी न्यायालयात सादर केलेले नाहीत. श्रीकांत जगताप हे भाजपाचे नगरसेवक आहेत. राजकीय वैमनस्यातून पोलिस कर्मचारी पवार यांना खोटी फिर्याद देण्यास काही तत्कालीन नेत्यांनी भाग पाडले व श्रीकांत जगताप यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना या खटल्यामध्ये खोटे गुंतविले, असा युक्तिवाद ॲड.मिलिंद पवार यांच्याकडून करण्यात आला.
हा युक्तिवाद ग्राह्य धरत सर्व आरोपींची पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.