पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महायुतीकडून सध्या राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क अभियान राबवले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गट आणि भाजप महायुतीकडून आता १४ जानेवारी रोजी 38 जिल्ह्यांमध्ये संयुक्त मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. पुण्यामध्ये देखील हा युतीचा मेळावा पार पडणार आहे.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर मित्र पक्षांचा पुणे जिल्ह्याचा पहिला संयुक्त मेळावा रविवारी म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील शुभारंभ मंगल कार्यालयात दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व 38 जिल्ह्यांमध्ये संयुक्त मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानुसार हा मेळावा होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री मेळाव्याला मार्गदर्शन करणार असून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार या मेळाव्यात मार्गदर्शन करतील, असं मोहोळ म्हणाले.
लोकसभा निवडणुकीचे कामाचे व्यवस्थापन करणे, मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजना, देशातील महायुती सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संवाद साधणे आणि विविध प्रकल्प व विकास कामांची माहिती नागरिकांना देणे अशा प्रकारचे नियोजन मेळाव्यात करण्यात आले आहे. घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाने काम व्हावे हाही मेळाव्याचा उद्देश असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले आहे.