पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळवर आज दुपारी दीडच्या सुमारास अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भर दिवसा पुण्यात घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आजच शरद मोहोळचा लग्नाचा वाढदिवस देखील असून याच दिवशी ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हा प्रकार घडला त्या सुतारदरा परिसरात धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे.
दुपारी दीडच्या सुमारास कोथरूड येथील सुतारदरा येथे शरद मोहोळवर अज्ञात हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या, अचानक घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील कुख्यात गुन्हेगार म्हणून शरद मोहोळची ओळख आहे. अपहरण, खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न, यांसारखे अनेक गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. येरवडा कारागृहात असताना मोहळने विवेक भालेरावच्या मदतीने दहशतवादी कातील सिद्दीकीचा खून केला होता.
जामिनावर बाहेर आल्यानंतर शरद मोहोळने सामाजिककार्याला सुरुवात केली होती, तर त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधान देखील आले होते. दरम्यान आज शरद मोहोळचा दिवसाढवळ्या खून करण्यात आल्याने कोथरूड परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.