पुणे: शहरातील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे कसबा विधानसभा (Kasba VIdhansabha). सध्या शहरात लोकसभेची चर्चा असली तरी कसब्यात मात्र नागरिकांच्या विकासकामांवरून लावण्यात येणारे बॅनर्स चर्चेचा विषय बनले आहेत. आता घोरपडी पेठेत भाजपा निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane) यांचे आभार मानणारे बॅनर्स हटवत आमदारांचे बॅनर्स लावण्यात आल्याने राजकीय श्रेयवादाची लढाई रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर सुरु असणारे हे पोस्टरवॉर पोलिसांकडे तक्रार करण्यापर्यंत पोहचले आहे.
घोरपडी पेठेतील(Ghorpadi Peth) न्यू मोमीनपुरा कब्रस्तान समोरील ड्रेनेज लाईनचे घाण पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. स्थानिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर महापालिकेच्या निधीतून दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली. हेमंत रासने यांच्या माध्यमातून क्षेत्रीय आयुक्त सकपाळ यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला, त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसह स्वतः संबंधित ठिकाणी जात तात्काळ कामास सुरुवात केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. हे काम झाल्यानंतर रासने यांचे आभार मानणारे बॅनर्स देखील घोरपडी पेठेत लावण्यात आले.
दरम्यान, काल रासने यांचे पोस्टर्स हटवत आमदारांचे आभार मानणारे “ना खासदारांनी काम केलं, ना नगरसेवकांनी काम केलं, काम केलं ते आमदारांनी” असे पोस्टर्स येथे लावण्यात आले. ड्रेनेज लाईनचे काम सुरु असतानाच एकाचे बॅनर्स हटवून दुसऱ्याचे बॅनर्स लागल्याने नागरिकांकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली. “आधी आमच्या अडचणी सोडवा, मग तुमचे कितीही बॅनर्स लावा”, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. हा प्रकार घडल्यानंतर आक्रमक झालेल्या रासने समर्थकांनी थेट पोलिसांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली.
यासंदर्भात बोलताना हेमंत रासने म्हणाले “मोमीनपुरा येथील स्थानिकांनी माझ्याकडे ड्रेनेज लाईनची तक्रार केल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांकडे मी स्वतः पाठपुरावा केला. त्यामुळे ड्रेनेज लाईनची दुरुस्ती तसेच नवीन पाईप टाकण्याचा कामाला सुरुवात करण्यात आली. माझ्या पाठपुराव्याने काम झाल्याने स्थानिकांनी आभार मानणारे बॅनर लावले. मात्र काही लोकांना फुकटच्या प्रसिद्धीसाठी बॅनरबाजी करण्याची सवय लागली आहे. आता न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी त्यांच्याकडून दादागिरी होताना दिसत आहे. तुम्ही शंभर बोर्ड लावा आमची काही हरकत नाही, मात्र आधी लावलेले बोर्ड काढले जात असतील तर खपवून घेतले जाणार नाही”.