पुणे: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या स्थळाचे महत्व लक्षात घेता मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटल आहे. पवार यांनी आज सकाळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा, महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेस भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष दीपक मानकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणेआदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले “भिडेवाडा येथे जागेची मर्यादा लक्षात घेता तज्ज्ञांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येईल. पुढच्या पिढीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य लक्षात रहावे आणि याठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू झाली हे कळावे या पद्धतीने सर्व स्मारकाची रचना करण्याचा प्रयत्न आहे. बाहेरून पुरातन वास्तू दिसावी आणि आतल्या बाजूस विद्यार्थीनी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा असाव्यात असा प्रयत्न राहील. वाहनतळासाठीदेखील व्यवस्था करण्याबाबत परिसरातील जागेचा उपयोग करता येतो का” याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.