पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना सोमवारी मोठा दिलासा मिळाला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याशी संबंधित कलमाडी यांच्या विरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणातील ईडी तपास बंद झाला आहे. २०१० साली कॉमनवेल्थ घोटाळा झाल्याचे सुरेश कलमाडी यांच्यावरती राजकीय आरोप झाले होते. त्यानंतर सुरेश कलमाडी यांचं राजकीय अस्तित्व संपलं. तब्बल 15 वर्षांनी हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याशी संबंधित कलमाडी यांच्या विरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणातील ईडी तपास बंद झाला आहे.
ईडीकडून न्यायालयामध्ये या प्रकरणातला क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर पुण्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. १५ वर्षे जुन्या प्रकरणावर पडदा टाकत दिल्ली न्यायालयाने काल २०१० सालच्या कॉमनवेल्थ घोटाळा (राष्ट्रकुल स्पर्धाच्या) आयोजन समितीचे माजी प्रमुख सुरेश कलमाडी, तत्कालीन सरचिटणीस ललित भानोत व इतरांविरुद्ध मनी लॉड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) क्लोजर रिपोर्ट स्विकारला आहे.
ईडीच्या क्लोजर रिपोर्टनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरेश कलमाडी यांच्या घरासमोर आनंद साजरा केला. पेढे वाटप करत घोषणाबाजी केली. ‘सबसे बडा खिलाडी असणाऱ्या सुरेश कलमाडी यांना खोट्या आरोपात गोवण्यात आल्यामुळे पुणेकर एका मोठ्या नेतृत्वाला मुकले’, असा आरोप यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
ऑक्टोबर २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या संयोजक समिताचे अध्यक्ष सुरेश कलमाडी होते. त्यांच्यावर राष्ट्रकुल स्पर्धेत सुमारे १ हजार ७०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. त्यावेळी हा तपास केंद्र सरकारने सीबीआयकडे सोपविला होता. त्यानंतर २५ एप्रिल २०११ रोजी सीबीआयने त्यांना अटक केली होती.
क्विन्स बॅटन रिलेच्या आयोजनात गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल करुन कलमाडी आणि त्यांचे सहकारी ललित भानोत, व्ही. के. वर्मा, शेखर देवरुखकर यांना अटक केली होती. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सीबीआयच्या हाती ठोस पुरावे मिळाले होते. त्यामुळे सीबीआयने कलमाडींना १२० ब आणि ४२० कलमाखाली गुन्हा दाखल करुन अटक केली होती.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा
-मुहूर्त ठरला! अखेर सिंहगड रोडचा उड्डाणपूल होणार खुला