पुणे : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) संदर्भात महत्वाची बातमी आहे. राज्यातील आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे आतापर्यंत ६९ हजार ६२१ मुलांनी प्रवेश घेतले आहेत. प्रतीक्षा यादीच्या (वेटींग लिस्ट) दुसऱ्या फेरीतून प्रवेश घेण्याची आज, सोमवारी (२१ एप्रिल) शेवटची संधी आहे. त्यामुळे मुलांनी आपले प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेमार्फत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांना खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश मिळतो. यंदा प्रवेश प्रक्रियेत राज्यातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये एक लाख ९ हजार १०२ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी तीन लाख ५ हजार १५१ मुलांचे अर्ज आले. त्यापैकी एक लाख ९ हजार ९६७ मुलांना प्रवेश जाहीर झाले. त्यानंतर आता हे प्रवेश निश्चित करण्याची आज शेवटची संधी आहे.
पुणे जिल्ह्यातील ९६० शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. या शाळांमध्ये प्रवेशासाठी १८ हजार ४९८ जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेशासाठी ६१ हजार ५७३ मुलांचे अर्ज आले होते. त्यापैकी १८ हजार १६१ मुलांना प्रवेश जाहीर झाले होते. सध्यस्थितीत १२ हजार २२५ मुलांचे प्रवेश झाले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेश होणार आहेत.
सध्या आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, नियमित फेरीतील प्रवेशानंतर सध्यस्थितीत प्रतिक्षा यादीतील मुलांचे प्रवेश सुरू आहे. यादीच्या दुसऱ्या फेरीतून प्रवेश घेण्याची १५ एप्रिल तारीख होती. मात्र, पालकांच्या मागणीमुळे २१ एप्रिलपर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी आजच आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित करावेत.
महत्वाच्या बातम्या
-वॉटर पार्कला जाताना काळजी घ्या! झीपलाईन करताना तरुणीचा पाय घसरला अन्…
-पुण्यात काँग्रेसला आणखी मोठा धक्का; हर्षवर्धन सपकाळांकडे आणखी एक राजीनामा
-‘मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही…’; शरद पवारांच्या आमदारांची प्रतिक्रिया
-‘देवेंद्र फडणवीसांमुळेच संग्राम थोपटे हे…’; हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
-माजी आमदार संग्राम थोपटेंनी सोडला ‘काँग्रेस’चा ‘हात’; २ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश?