पुणे : सध्या उन्हाळ्याचा सीझन सुरु असून कडाक्याच्या उन्हापासून थंडाव्यासाठी अनेकांचा कल हा वॉटर पार्ककडे असतो. अशातच पुणे-सातारा महामार्गावर एका वॉटर पार्क अँड रिसॉर्टमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. पुणे-सातारा हायवेवर असणाऱ्या राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्टमध्ये १८ एप्रिल रोजी सायंकाळी झिपलाईनवरुन पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मृत तरुणीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तरल अरुण अटपळकर (वय २८) असे मृत तरुणीचे नाव आहे. अटपळकर कुटुंबीय सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी राजगड वॉटर पार्कमध्ये गेले होते. तिथे झिपलाईन करताना तरलचा तोल गेला आणि ती खाली पडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे पार्कमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या वॉटर पार्कमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप तरलच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरु केला असून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. पंकज देशमुख म्हणाले की, “आमचे पथक राजगड वॉटर पार्कमधील तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. लवकरच अहवाल आल्यानंतर कारवाई सुरू करू. राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्ट सध्या बंद ठेवण्यात आले आहे. अशा घटना टाळण्यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
महत्वाच्या बातम्या
-पुण्यात काँग्रेसला आणखी मोठा धक्का; हर्षवर्धन सपकाळांकडे आणखी एक राजीनामा
-‘मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही…’; शरद पवारांच्या आमदारांची प्रतिक्रिया
-‘देवेंद्र फडणवीसांमुळेच संग्राम थोपटे हे…’; हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
-माजी आमदार संग्राम थोपटेंनी सोडला ‘काँग्रेस’चा ‘हात’; २ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश?
-भाजप पुण्याचा कारभारी बदलणार; ब्राह्मण, मराठा की ओबीसी कोणाच्या गळ्यात पडणार शहराध्यक्ष पदाची माळ?