पुणे : पुणे महापालिकेच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांसाठी सुरक्षारक्षक पुरवण्यासाठी १३९ कोटी ९२ लाखांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र या निविदेमध्ये विशिष्ट ‘लाड’क्या ठेकेदारांना काम मिळवून देण्यासाठी अधिकारी ‘सैनिका’चे काम करत असल्याची टीका होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सावध भूमिका घेत पूर्वीच्या निविदांचा तसेच प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव तपासून वेळपडल्यास सध्याची निविदा दोन-तीन ठेकेदारांत विभागून देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले आहे.
सुरक्षा रक्षकांची नेमणूक महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या नियमानुसार होणे गरजेचे आहे. मात्रयातूनही पळवाट काढण्यासाठी ‘बहुउद्देशीय कामगार’ नावाखाली निविदा काढत पालिका अधिकाऱ्यांनी चलाखी दाखवली आहे. “महाराष्ट्रात सात वर्षांचा अनुभव आवश्यक”ची अट देखील घालण्यात आल्याने राज्यातील केवळ एक-दोन कंपन्याच पात्र ठरू शकतात. त्यामुळे या निविदेत स्पर्धाच उरणार नसल्याचं जाणकार सांगतात. हा सर्व प्रकार पुढे आल्यानंतर महापालिका प्रशासनावर जोरदार टीका होऊ लागली होती. यानंतर आता आयुक्तांनी निविदा दोन-तीन ठेकेदारांत विभागून देण्याचे सुतवाच केले आहे.
दरम्यान, या निवेदेतील संपूर्ण निविदा प्रक्रियेच्या विरोधात वसीम शेख यांच्यावतीने विधिज्ञ असीम सरोदे यांनी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. तसेच या न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली जाणार आहे.
नेमका आक्षेप काय?
‘बहुउद्देशीय कामगार / मदतनीस, मनुष्यबळ पुरविणे असे शब्द वापरून कायद्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
निविदा भरणाऱ्या कंपनीला मागील 7 वर्षांचा सुरक्षा व्यवस्थेच्या कामकाजाचा अनुभव असावा ही अट सुद्धा शंकास्पद आहे.
7 वर्षांचाच अनुभव असावा असे का? साधारणतः 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, 15 वर्षांचा अनुभव असावा असे उल्लेख अटींमध्ये असतात.
सुरक्षा व्यवस्थेच्या कामकाजाचा महाराष्ट्र राज्यातील अनुभव असणे आवश्यक, असा उल्लेख करून महाराष्ट्रातील दोनच कंपन्यांना निविदेनुसार काम मिळेल अशी योजना आखल्याचा संशय.
महाराष्ट्रातील लहान मोठ्या कंपन्यांना, शासकीय, निमशासकीय संस्थांना तसेच परराज्यातील अनुभवी कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी होता यावे, असा fairness आणि fair – competition चा मुद्दा आपण ठरवून वगळण्याचा आरोप.
महत्वाच्या बातम्या
-पुणेकरांच्या बाकरवडीत बनवाबनवी; ‘चितळे स्वीट होम’वर गुन्हा दाखल
-पालिका करणार थेट कंपन्याकडून डांबर खरेदी मात्र, हात काळे केलेल्या अधिकाऱ्यांचं काय?
-एसटीच्या थांब्यावर अस्वच्छ, बेचव अन्न; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी दिले ‘हे’ आदेश
-औंधमध्ये गाळेधारकांना बेकायदा परवाने वाटप; ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश
-काका-पुतणे पुन्हा एकदा एकत्र दिसणार! अजित पवार- शरद पवारांची १० दिवसांत तिसरी भेट