पुणे : पुणे महापालिकेला डांबर पुरवणाऱ्या ठेकेदाराने पालिकेच्या अधिकारी आणि कर्माचाऱ्यांच्या संगनमताने पालिकेची लूट केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर आता महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ज्या पथविभागावर आरोप झाले, त्याच पथविभागाच्या प्रमुखावर चौकशी करण्याची जबाबदारी सोपवल्यामुळे आता मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. डांबर घोटाळ्याच्या आरोपानंतर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी डांबर खरेदीच्या निविदा थांबवल्या आणि पुढील ३ महिने थेट कंपनीकडूनच डांबर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेला डांबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदार कंपनीने पथविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने महापालिकेची कोट्यावधींची फसवणूक केल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अॅड. निलेश निकम यांनी केला होता. या ठेकेदाराने महापालिकेला डांबर पुरवठा केल्याची बिले दाखवून तेच डांबर पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासाठीच्या कामांसाठी पाठवले. एकाच मालाती दोन्हीकडून बिले घेतल्याचा आरोप करत टँकर क्रमांक दिनांक आणि वेळेसह महापालिका आयुक्तांकडे पुरावे दिले होते. तसेच या गैरव्यवहारामध्ये महापालिकेला डांबर मिळाले नसताना त्याचे पैसे अदा केल्याचे देखील निकम यांनी आपल्या आरोपामध्ये सांगितले होते.
या आधी पालिका थेट रिफायनरी कंपनीकडून डांबर खरेदी करत होती. मात्र, गेल्या ३ वर्षांपासून ठेकेदाराच्या मार्फत डांबर खरेदी केली जात आहे. त्यामुळे पालिकेला १०-१२ कोटी रुपये अधिक द्यावे लागले आहेत. पालिकेच्या पथविभागाने पुन्हा ३ वर्षांसाठी पुरवठ्याची निविदा मागवली होती. पुन्हा पुर्वीच्या एकाच कंपनीची निविदा आली आहे. संबंधित ठेकेदाराबद्दल तक्रार केली असतानाही फसवणूक करणाऱ्या कंपनीलाच काम देण्याचा घाट पथ विभागाकडून घातला जात असल्याचा देखील आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणावर पालिका आयुक्त डॉ. राजेद्र भोसले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
पालिकेचे दुर्लक्ष – दोषींवर कारवाई होणार का?
डांबर पुरवठा कमी होत असतानाही अधिकारी गप्प का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. योग्य प्रमाणात डांबर न वापरल्याने रस्त्यांची अवस्था खराब होते, खड्डे वाढतात आणि देखभाल खर्चही वाढतो. नागरिकांच्या कराच्या पैशांचा अपव्यय आणि भ्रष्टाचार यामुळे पुणेकरांमध्ये संतापाची भावना आहे.
महत्वाच्या बातम्या
-एसटीच्या थांब्यावर अस्वच्छ, बेचव अन्न; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी दिले ‘हे’ आदेश
-औंधमध्ये गाळेधारकांना बेकायदा परवाने वाटप; ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश
-काका-पुतणे पुन्हा एकदा एकत्र दिसणार! अजित पवार- शरद पवारांची १० दिवसांत तिसरी भेट
-PMC: ठेकेदाराचे ‘लाड’ पुरवण्यासाठी अधिकारीच बनले ‘सैनिक’, बहुउद्देशीय पायघड्यांवर गुळगुळीत उत्तर