पुणे : पुण्यातील नामांकित रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनावर सर्वत्र टीकेची झोड उठवण्यात आली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले असून पालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या थकबाकीवरुनही सुप्रिया सुळेंनी महापालिकेला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
‘माझ्या माहितीप्रमाणे, ही जागा आदरणीय शरद पवार साहेब यावेळी मुख्यमंत्री असताना आणि श्रीनिवास पाटील हे कलेक्टर असताना ही जागा देण्याबाबत प्रोसेस झाली. आणि लतादीदींच्या पुढाकाराने हे हॉस्पिटल उभारण्यात आलं. हा या रुग्णालयापाठचा इतिहास आहे. त्यानंतर अनेक वर्ष रुग्णांना तिथे उपचार मिळत आहेत. मधल्याकाळात काही तक्रारी येत होत्या, पण रुग्णालय म्हटल्यावर सामंजस्याची भूमिका घेण्यात आली. देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव या रुग्णालयाला देण्यात आलं त्याच रुग्णालयामध्ये एवढी मोठी दुर्दैवी दुर्घटना होते, हे अतिशय धक्कादायक आणि संतापजनक आहे. मंगेशकर कुटुंबियांचे योगदान हे केवळ देशात नव्हे तर जगभरात आहे. त्यामुळे जी भावना लोकांची आहे त्याची चर्चा झाली पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“रुग्णालय प्रशासनात काही माणुसकी उरली आहे की नाही?”
‘एखादे रुग्णालय इतक्या असंवेदनशीलपणे कसं काय वागू शकतं? रुग्णालय प्रशासनाने कितीही माफी मागितली तरी त्यांचा गुन्हा कमीच आहे. पीडित महिला ही कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण, पत्नी, मुलगी आहे. त्यामुळे समाजात आणि रुग्णालय प्रशासनात काही माणुसकी उरली आहे की नाही? असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाची तब्बल २७ कोटींची थकबाकी भरणे बाकी असल्याचे देखील समोर आले आहे. यावरही सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
“हॉस्पिटलने २७ कोटींच्या कराबाबत ४८ तासात काही निर्णय केला नाही तर..”
‘सामान्य लोकांनी टॅक्स भरला नाही तर त्यांच्या घरापुढे तुम्ही बँड वाजवता मात्र या संस्थेने इतक्या कोटींचा कर थकवला असताना महापालिका प्रशासन कोणतीच ठोस का भूमिका घेत नाही. सामान्य लोकांसाठी एक न्याय आणि अशा या संस्थेला दुसरा न्याय का? लावता. पुणे महानगरपालिकेने मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात प्रॉपर्टी टॅक्स बाबत ४८ तासात काही निर्णय केला नाही तर महानगरपालिकामध्ये मी आंदोलन करणार आहे’, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-तनिषा भिसे मृत्यू प्रकरण: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. घैसास यांचा राजीनामा
-‘हिंदूंनी हिंदूंना मारायचं अन् औरंगजेबाचा विषय चर्चेला आणायचा’; माजी महापौरांचं वक्तव्य
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणारच?, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘चूक ते चूकच’