पुणे : गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात नामांकित रुग्णालय असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णायलाची चांगलीच चर्चा रंगली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांकडे २० लाखांची मागणी केली. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून एका महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरुन अनेक मंत्र्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या असून रुग्णालयाबाहेर आंदोलन, चिल्लरफेक, शाईफेक, रुग्णालयाच्या पाट्यांवर काळं फासणे असे सगळे प्रकार घडल्याचे पहायला मिळाले. अशातच डॉ. घैसास यांचे बाह्यरुग्णालयाची भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. यावरुन आता भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी डॉ. घैसास यांच्या रुग्णालयाची केलेल्या तोडफोडीवरुन डॉ. मेधा कुलकर्णी यांनी रविवारी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहत या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘सोम्या-गोम्या अर्ध्या हाळकुंडाने पिवळे झालेल्यांनी कायदा हातात घेऊ नये’
“रुग्णालयाचा किती दोष आहे याची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी जे वर्तन केले त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे. आंदोलन करण्याच्या इतर सभ्य पद्धती आहेत ज्याचा अवलंब करणे विचारधारेला धरून ठरेल, असे मला वाटते. प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचा मोह कार्यकर्त्यानी टाळला पाहिजे. हे समजावून सांगण्याचे कार्य पुणे शहराचे अध्यक्ष या नात्याने आपण कराल व संबंधित पदाधिकाऱ्यांना समज द्याल, अशी आशा करते. सोम्या-गोम्या अर्ध्या हाळकुंडाने पिवळे झालेल्यांनी कायदा हातात घेऊ नये”, असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.
“पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो. परंतु अशा गोष्टींमुळे प्रतिमा डागळली जाते व त्याचा परिणाम सर्वानाच भोगावा लागतो. शिवाय वडाचे तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीचे व एखाद्या समूहाचे किंवा विशिष्ट समाजाचेही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. राजकीय व्यक्तींनी त्यामुळे कायम कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणे आवश्यक असते, असेही मला वाटते,” असेही मेधा कुलकर्णी पत्रात म्हणाल्या आहेत. यावर आता धीरज घाटेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले धीरज घाटे?
‘मला हे पत्र मेधा कुलकर्णींनी दिलं नाही. माध्यमांच्या मार्फत हे पत्र मला समजलं. त्यांनी हे पत्र थेट मला द्यायला हवं होतं. महिला मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांमुळे त्यांनी पत्र दिलं आहे. मात्र, एका महिलेला प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याने महिलांचा रोष हा साहजिक आहे. मेधा कुलकर्णी आणि मी काल स्थापना दिनाच्या कार्यक्रमात भेटलो होतो, त्यावेळी या पत्रासंदर्भात काहीही बोलणं झालं नाही. त्यांनी पक्षाच्या बैठकीत ह्या गोष्टी बोलायला हव्या होत्या, पत्राच्या माध्यमातून सगळ्यांना द्यायला नको होतं, मीडियाच्या माध्यमातून हे पत्र मला मिळालं आहे’, असे धीरज घाटे म्हणाले आहेत. त्यामुळे आता दीनानाथ रुग्णलयावरुन पुणे भाजपमध्ये शीतयुद्ध पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘हिंदूंनी हिंदूंना मारायचं अन् औरंगजेबाचा विषय चर्चेला आणायचा’; माजी महापौरांचं वक्तव्य
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणारच?, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘चूक ते चूकच’
-आधी चिल्लर फेकली आता शेण फासणार; दीनानाथ रुग्णालयाविरोधात आंदोलक आक्रमक
-रुग्णांकडून लाखोंचे बिल घेणाऱ्या दीनानाथ हॉस्पिटलने थकवली कोट्यवधीचा कर, नेमका आकडा किती?