पुणे : शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या पैशाच्या हव्यासापोटी एका महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या कारभार सर्वांसमोर आल्यानंतर शहरात चांगलंच वातावरण तापलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं नाव मोठं अन् लक्षण खोटं हे स्पष्ट झालं. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा हिला लग्नानंतर तब्बल ८ वर्षांनी मूल होणार त्यामुळे ती खूष होती. मात्र, रुग्णालायाच्या या कारभाराने तिच्या आनंदावर विरजण टाकलं. शुक्रवारी संपूर्ण दिवस रुग्णालायाविरोधात राजकीय पक्षांकडून आणि सामाजिक संघटनांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. सोशल मीडियावर देखील रुग्णालयाची चांगलीच बदनामी झाली. एक निष्पाप जीव गेल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती आल्याचे पहायला मिळाले आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एक निवेदन जारी केले आहे. मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक धनंजय केळकर यांनी रुग्णालयाची भूमिका मांडतानाच रुग्णांच्या दृष्टीने एक सर्वात मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. आजपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एमर्जन्सीमध्ये येणाऱ्या कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट घेतले जाणार नाही, असे पत्र डॉ. केळकर यांनी जारी केले आहे.
दीनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो वा डिलिव्हरी डिपार्टमेंट आलेला असो, लहान मुलांच्या विभागातला असो त्यांच्याकडून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम घेणार नाही, असा विश्वस्त आणि मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला असून आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर सतत ठेवून वाटचाल करण्यात आली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला रुग्णांकडून अनामत रक्कम घेतली जात नव्हती. पण कालांतराने यात बदल झाला. तनिषा भिसे प्रकरणी सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच परंतु या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करत आहोत याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.
कालचा दिवस ‘दीनानाथ’च्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता. आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली, महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली, एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले व या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली व लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे, असेही या पत्रात केळकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मी पण माझी पोरगी गमावली, आंदोलन करुन बसले काहीही झालं नाही’; रुग्णालयाबाहेर आईची प्रतिक्रिया
-‘रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; काँग्रेसकडून रुग्णालयाच्या बोर्डावर शाईफेक
-मंगेशकर रुग्णालयाची स्वतःलाच क्लीनचीट, ‘ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून त्यांनी…”
-हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण