पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालायमध्ये पैशाच्या हव्यासापायी एका गर्भवती महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन आता पुणेकरांसह पुण्यातील शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आक्रमक आंदोलन सुरु आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐन वेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. मृत्यू झालेल्या महिलेचा पती हा भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए आहेत.
‘वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती’, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. प्रसूती वेदना तीव्र होऊ लागल्याने महिलेला खासगी गाडीने २५ किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या रुग्णालयात दाखल करताच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आता या घटनेवरून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर संबंधित रुग्णालयावर चौकशी करून कारवाईचे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक येणारे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्य द्वारावर तपासूनच आत मध्ये सोडलं जात आहे. मुख्य द्वारावर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांकडून आज रुग्णालयात चौकशी करण्यात येणार आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मंगेशकर रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा मोठा; मंत्रालयातून फोन तरी ऐकेना, गर्भवतीचा दुर्दैवी अंत
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: आरोपी गाडेच्या वकिलाचा जामीनासाठी अर्ज, धक्कादायक दावा