पुणे : अलिकडच्या काळात लग्नाच्या बाबतीत फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असतात. अशातच विवाह जुळवणाऱ्या संस्थांची देखील काही कमी नाही. या संस्थांच्या माधमातून तसेच ऑनलाईन संकेतस्थळावरुन देखील अनेकांची फसवणूक होत असते. अशातच पुणे शहरातील एका तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तब्बल ३५ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या तरुणाला बाणेर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. साईश विनोद जाधव (वय २५, रा. साईबाबानगर, शेल कॉलनी रस्ता, चेंबूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. साईश विरोधात २९ वर्षीय तरुणीने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एप्रिल २०२३ पासून गुन्हा दाखल होईपर्यंत आरोपी तरुणीची फसवणूक करीत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील एका आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या या तरुणीने विवाह जुळवणाऱ्या नामांकित संकेतस्थळावर नोंदणी केली होती. या संकेतस्थळावरुन आरोपीने या तरुणीशी संपर्क साधला. लग्न करण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर तो तिला भेटण्यासाठी ती राहत असलेल्या बाणेर परिसरातही आला. एका रेस्टराँटमध्ये दोघांनी जेवण करून एकमेकांना पसंती कळवली. तिने त्याला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले असता ‘आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून, भाऊ दुबईत नोकरी करतो,’ असे तिला सांगितले. तिने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर दोघांच्या गाठीभेटी, बोलणं वाढला. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्याकडून पैसे लुबाडण्यास सुरुवात केली.
‘एका मित्राने माझी आर्थिक फसवणूक केली असून, पैसे न भरल्यास मला कारागृहात जावे लागेल,’ अशी बतावणी करून त्याने तरुणीकडे पैसे मागितले, तसेच मोबाईल बिघडल्याचे सांगून तिच्याकडून महागडा मोबाइलही घेतला. त्याला पैसे देण्यासाठी तरुणीने कंपनीकडून तसेच खासगी वित्तपुरवठा कंपनीकडून कर्ज काढले. दीड- दोन वर्षात आरोपीने तरुणीकडून तब्बल ३५ लाख २५ हजार रुपये उकाळले. त्यानंतर तरुणीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे द्यायचा. या सगळ्या प्रकारानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी आता साईश विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या बाबतचा अधिक तपास सहायक निरीक्षक अनिल केकाण हे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-GBS: पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे ‘जीबीएस’ची लागण; काय म्हणाले अजित पवार?
-महाराष्ट्र केसरी: राक्षे-मोहोळ कुस्ती पुन्हा रंगणार? ५ जणांची चौकशी समिती
-अजितदादांच्या ‘गुगली’ने मनसे नेत्याची दांडी! थेट म्हणाले “तुझ्या नेत्याला सांग..”
-ठाकरेंसाठी घेतला उदय सामतांशी पंगा, आता शिंदेसेनेत प्रवेशासाठी धडपड सुरू