पुणे : माजी मंत्री आणि शिवसेनेचे वजनदार आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचं काल (१० फेब्रुवारी) अपहरण झाल्याच्या नाट्यमय घडामोडी सोमवारी रंगल्या. तानाजी सावंत यांच्याकडून ऋषिराजला ‘दोघे जण कारमधून घेऊन गेल्याची’ तक्रार पोलिसांत देण्यात आली. पुणे पोलिसांची तपास यंत्रणा ताबडतोब कामाला लागली अन् अवघ्या काही तासातंच मुलगा ऋषिराजला पुणे पोलिसांनी शोधून काढलं. अपहरणाची बातमी पसरल्यानंतर काही वेळातच पुण्याचे सहआयुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषिराज सावंत याचे अपहरण झाले नसून मित्रांसोबत तो बँकॉकला निघला होता, अशी माहिती माध्यमांना दिली.
पोलीस तपासात तो मुलगा लोहगाव विमानतळावरुन चार्टर्ड विमानाने मित्रांसह बँकॉकला निघाल्याचे समोर आले. त्यानंतर सावंतांनी त्यांची राजकीय ताकद वापरुन मुलाला परत आणलं. यामध्ये नागरी उड्डाण मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली आहे.
तानाजी सावंत यांनी केद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला अन् मोहोळांनी तातडीनं हालचाली केल्या. नागरी उड्डाण मंत्रालयाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क केला. मग एटीसीनं ऋषिराज प्रवास करत असलेल्या विमानाच्या पायलटशी संपर्क साधला. साडे चार वाजता उड्डाण केलेले विमान त्यावेळी बंगालच्या उपसागरावरुन उड्डाण करत होते. तातडीने माघराी फिरा, अशी सूचना एटीसीकडून पायलटला देण्यात आली.
मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर बंगालच्या उपसागरावर पोहचलेल्या ऋषिराजच्या खाजगी विमानने हवेतूनच युटर्न घेतला. विमानाने घेतलेल्या युटर्नची ऋषिराजला कल्पनाही नव्हती. विमान जेव्हा पुणे विमानतळावर लँड झाले तेव्हा ऋषिराज सावंत कळालं की, आपण बँकॉकला नाही तर पुन्हा पुण्यातच आलोय.
दरम्यान, या सर्व नाट्यमय घडामोडींनंतर सर्वसामान्यांना दाद न देणारी तसेच तत्परतेने मदत न करणारी यंत्रणा एखाद्या माजी मंत्र्यांसाठी कशाप्रकारे कामाला लागते, हे तर दिसून आलंच. मात्र आता सर्वसमान्यांसाठी प्रशासन इतक्या तातडीने हालचाली करणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात जीबीएसचा धोका वाढतोय; आणखी एका रुग्णाचा मृत्यू
-खेकड्यांनी धरण फोडलं ते मुलाचं अपहरण! तानाजी सावंतांची वादग्रस्त प्रकरणे…
-Pune Traffic: दारु पिऊन गाडी चालवणं तरुणाला पडलं महागात; ५ दिवस जेल अन्…
-पुणे विमानतळावर ‘डिजियात्रे’चा मोहोळांकडून शुभारंभ; मात्र इतर ३३ विमानतळांबाबत दिली ‘ही’ कबुली
-Pune: महापालिका निवडणुकीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्वाची माहिती