पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. शहरात तोडफोड, कोयता गँगची दहशत, चोऱ्या, लैंगिक अत्याचार, मारहाणीचे प्रकार घडत असताना शहरात शांतता आणि सुव्यवस्था रहावी, यासाठी पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी ‘कॉप 24′ उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुणे पोलीसांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे पोलिसांनी ‘गुन्हेगार दत्तक योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘गुन्हेगार दत्तक योजना’ या योजनेंतर्गत प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला काही गुन्हेगारांची जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे, घरी भेट देणे आणि ठाण्यात बोलावून तपासणी करणे या उपाययोजना करण्यात येणार आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहराची प्रतिमा मलिन होत असून सर्वसामान्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, शहराच्या गुन्हेगारीवरुन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार देखील नेहमीच पोलीस आधिकाऱ्यांना सूचना करताना पहायला मिळतात. त्यातच अजित पवारांनी या संपूर्ण प्रकरणांची दखल घेत पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. यानंतर पुणे पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत दत्तक योजनेसह वाहन तोडफोडच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांना जरब बसवण्याच्या आदेश पोलिसांना दिले.
गुन्हेगारावर एम पी डी ए, तडीपारी, मकोका अंतर्गत कारवाईचे आदेशही रंजन शर्मा यांनी पोलिसांना दिले आहेत. गुन्हेगार दत्तक योजनेद्वारे पुणे पोलिसांना गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मदत होणार असल्याचं दिसत आहे. कारण या योजनेद्वारे पोलिस प्रत्येक गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवून असणार आहेत. पोलिसांचे लक्ष असल्याने गुन्हेगार पुन्हा गुन्हे करण्यापासून लांब राहू शकतो किंवा कोणता गुन्हा केला तर ताबडतोब कारवाई करता येईल.
महत्वाच्या बातम्या-
-पोलीस दलात मोठी खळबळ; पीएसआयने संपवलं जीवन, नेमकं कारण काय?
-ठाकरेंच्या पुणे दौऱ्याआधीच ‘या’ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी, ठाकरेंचा ‘मास्टर प्लान’ काय?
-पालिकेच्या स्थायी समिती बैठकीत पुणेकरांच्या करवाढीसाठी महत्वाचा निर्णय
-Pune GBS: ‘जीबीएस’मुळे पुण्यात आणखी एकाचा मृत्यू; रुग्णसंख्या १७३ वर
-‘महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर…’; अजितदादांचा AK47 हातात घेऊन निशाणा कोणावर?