पुणे : आज गणेश जयंतीनिमित्त पुणे शहरातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला पीएनजी ज्वेलर्सकडून तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा सोन्याचा कमळ हार अर्पण करण्यात आला आहे. श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेत पीएनजी ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला १० पदरी भव्य ‘कमळ हार’ अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि कलेप्रती आपली निष्ठा दर्शवली आहे.
एक किलो वजनाच्या या हारामध्ये ४०० हून अधिक उपरत्ने जडवलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचे प्रतीक आहे. ‘कमळ हार’ हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला सोन्याच्या दागिन्याचा उत्कृष्ट नमुना आहे. पीएनजी ज्वेलर्सचे संस्थापक आणि गणपती भक्त दाजीकाका गाडगीळ यांनी ही अर्पण परंपरा सुरू केली, अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी दिली आहे.
‘कमळ हार’ हा अत्यंत नाजूकपणे साकारलेला दागिन्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. यात अनेक आध्यात्मिक प्रतीके जडविण्यात आली आहेत. या हाराच्या मध्यभागी असलेले तेजस्वी कमळ शुद्धतेचे प्रतिक आहे, त्याला दोन मोरांचा आधार मिळाला आहे. मोर हे दिव्य वैभव आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. हाराच्या आठ पदरांची रचना रुद्राक्षांच्या मण्यांसारखी आहे. ही रचना आध्यात्मिक संरक्षण आणि समतोलाचे प्रतीक दर्शवते.
पीएनजीकडून दगडूशेठ गणपतीला अर्पण केलेल्या या हाराला भक्तीचा अनोखा स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या आकारातील गडद लाल रत्नांचा समावेश करण्यात आला आहे. यातून परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर मिलाफ घडवला आहे. हा अद्वितीय दागिना २० कुशल कारागीरांनी २५ दिवसांच्या परिश्रमाने साकारला आहे. या हाराच्या निमित्ताने पूर्ण भक्तीभावाने आणि समर्पित भावनेने त्यांनी हा सुंदर दागिना घडवला, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरुन ८ फेब्रुवारीपासून ‘डिजीयात्रा’ सेवा!
-पुण्यात राज ठाकरे अन् एकनाथ शिंदेंची बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
-गणेश जयंतीनिमित्त कोणते रस्ते बंद, कोणते पर्यायी मार्ग, वाचा एका क्लिकवर…
-Pune GBS: धक्कादायक! टँकरच्या पाण्यात सापडले बॅक्टेरिया; पालिकेने बजावल्या नोटीसा
-खाकी वर्दीला कलंक: हुक्का पार्लर चालकाकडून ‘तो’ पोलीस उपनिरीक्षक घेत होता २० हजारांचा हफ्ता