पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. पुणे शहरामध्ये आतापर्यंत जवळपास ७८ रुग्ण तर पिंपरीमध्ये एकूण १३ रुग्ण आढळले आहेत. पिंपरीमधील जीबीएस आजार झालेल्या ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या आजाराचे रुग्ण गंभीर असून निम्म्यापेक्षा जास्त रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. अतिदक्षता विभागातील सरासरी ५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च असून हा खर्च सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही.
राज्य सरकारच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून जीबीएस या आजारावर उपचार होत आहेत. आता पुणे महापालिकाही गरीब रुग्णांच्या उपचाराचा खर्चात योगदान देणार आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ‘जीबीएस’च्या रुग्णांवर २ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होतात. या आजाराच्या उपचारांचा खर्च अधिक असल्याने २ लाखांवरील खर्च कुठून करावयाचा, असा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत. यामुळे महापालिकेने गरीब रुग्णांच्या उपचाराच्या खर्चात आर्थिक योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘जीबीएस’च्या रुग्णांवर प्लाझ्मा आणि ‘आयव्हीआयजी’ या दोन प्रकारांचे उपचार केले जातात. त्यातील प्लाझ्मा उपचारांसाठीचा खर्च ३ ते ३.५ लाख रुपये असतो, तर आयव्हीआयजी उपचारांचा खर्च ४ ते ५ लाख रुपयांवर जातो. प्लाझ्मा उपचार पद्धतीत रुग्णाच्या शरीरातील दूषित प्लाझ्मा काढून तो बदलला जातो. याच वेळी ‘आयव्हीआयजी’ उपचारांमध्ये रुग्णाला ‘इम्युनोग्लोब्युलिन’ हे इंजेक्शन दिले जाते. या एका इंजेक्शनची किंमत २० ते २५ हजार रुपये इतकी आहे. रुग्णाचे सरासरी वजन ६० किलो गृहित धरल्यास त्याला दिवसाला ५ ते ६ इंजेक्शन द्यावी लागतात. त्यामुळे एका दिवसाचा इंजेक्शनचा देखील खर्च लाखो रुपयांवर जातो.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरीतील गुइलेन बॅरी सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू; रुग्णालयाचा दावा वेगळाच
-पुण्यात नेमकं चाललंय काय? धर्मांतर करत नाही म्हणून महिलेला डांबून ठेवलंं अन्…