बारामती : गेल्या २ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यापासून पवार कुटुंब विभाजलेलं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमध्ये एकाच मंचावर येणार आहेत. शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात आता चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने दरवर्षी कृषी प्रदर्शनाचा आयोजन केले जाते. कृषी विज्ञान केंद्राच्या ‘कृषीक कृषी प्रदर्शना’च्या निमित्ताने दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत. शरद पवार या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. येत्या १६ ते २० जानेवारी दरम्यान बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अजित पवार आणि शरद पवार हे दोघे बुधवारी (दि. 15) एकाच मंचावर येणार आहेत.
आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि ADT चे चेअरमन राजेंद्र दादा पवार यांच्या पुढाकाराने बारामतीत ‘कृषी विज्ञान केंद्रा’त 16 ते 20 जानेवारी दरम्यान #कृषिक या कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. आदरणीय पवार साहेब आणि मा. अजितदादा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं… pic.twitter.com/wsyDxJGYYC
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 8, 2025
लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एका मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, (शुक्रवारी) काल एका कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवारांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीवरुन त्यांचे बंधू श्रीनिवास पवार आणि शरद पवार यांना मिश्किल टोला लगावला होता.
काय म्हणाले अजित पवार?
‘माझ्या भागात लोकसभेला आमचा उमेदवार ४८ हजारांनी पडला. मी माझ्या भावाला निरोप पाठवला, “अरे माझ्याविरोधात तुझ्या पोराला उभं करू”, तर तो, ‘अरे नाय बारामती साहेबांच्या मागं आहे’, असं मला म्हणाला. त्यावर मी म्हटलं, “आहे की, मी कुठे नाही म्हणतोय. पण, साहेबांचा नंबर झाल्यावर बारामती दादाच्या मागे आहे.” म्हणूनच मला लाखांपेक्षा जास्त मतांनी बारामतीकरांनी निवडून दिलं. मी आपला गप्प बसलो. सगळं खानदान माझ्याविरोधात प्रचार करत होतं’, असं म्हणत अजित पवारांनी संपूर्ण पवार कुटुंबाला डिवचल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आता येत्या १५ तारखेला अजित पवार आणि शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबातील काही सदस्य एका मंचावर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात काय राजकीय घडामोडी घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मावळ पॅटर्न’ला प्रदेश भाजपचा छुपा पाठिंबा होता?; बावनकुळेंनी केला मोठा खुलासा
-‘HMPV’ची जगाला धास्ती; पुण्यात मात्र आधीपासूनच होतेय व्हायरसची लागण
-‘तुम्हाला जमत नसेल तर पदं सोडा’; अजितदादा नेमकं कोणावर भडकले