पुणे : पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे तसेच प्राची अल्हाट यांचा पक्षप्रवेश झाला. या प्रवेशानंतर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, या नगरसेवकांनी केलेल्या आणखी एका वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
पुण्यातील भाजप कार्यालयामध्ये या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. “शिवसेनेमध्ये आम्ही गेली 25 वर्षापासून काम करत होतो, पक्षसंघटना वाढवण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले ते अतिशय प्रामाणिक होते. त्यामुळे त्या पक्षाविषयी आमच्याकडून कोणताही चुकीचा शब्द जाणार नाही, लोकांची कामे होण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे” असं विशाल धनवडे म्हणाले.
दरम्यान, शिंदे यांनी शिवसेना चोरली हे आत्तापर्यंत तुम्ही बोलत होतात त्यावर तुम्ही ठाम आहात का? असा प्रश्न विचारला असता, शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचं मत या पाचही नगरसेवकांनी ठासून सांगितलं. “खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे. पण जे काही राजकारण सुरू आहे ते चालू राहील. आमच्या पक्षप्रवेशाच्या पहिल्याच दिवशी आम्ही सांगितलेलं आहे. ज्या पक्षामध्ये आम्ही 25 वर्ष होतो तो पक्ष वाढवण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले ते अतिशय प्रामाणिक होते. त्यामुळे त्या पक्षाविषयी आमच्याकडून कोणताही चुकीचा शब्द जाणार नाही, असं धनवडे म्हणाले.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत या पाच माजी कट्टर शिवसैनिकांनी शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचं सांगितल्याने आता महायुतीत असणारी शिंदेंची शिवसेना काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘घोडगंगा कारखाना’ अजित पवारांच्या रडारवर; मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, अशोक पवारांचं टेंशन वाढलं
-पुण्यात नेमकं चाललंय काय? शिपायानेच केला विद्यार्थिनींचा चेंजिंगरूममध्ये व्हिडिओ शूट
-वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला मुख्यबाजार पेठेत उभारू लागल्या, तक्रार करण्यासाठी आमदार थेट पोलिसांत
-महिला कर्मचाऱ्यांचा सुरक्षेसाठी भाजप महिला आघाडी आक्रमक; पोलीस आयुक्तांची घेतली भेट
-…म्हणून आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदाचा खून; तपासात धक्कादायक कारण आलं समोर