पुणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असणारी नाराजी आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. ज्यांनी गेली पाच वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका तसेच विरोधात आंदोलने केली, तेच लोक आपलं घर वाचवण्यासाठी भाजपमध्ये येत असल्याची टीका होऊ लागली आहे. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट फ्लेक्स उभारत आपली नाराजी जाहीर केली आहे.
आज मुंबईमध्ये भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे सेनेतील नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडला. यामध्ये माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे तसेच प्राची अल्हाट आज भाजपवासी झाले आहेत. परंतु दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये यामुळे नाराजी पाहायला मिळत आहे.
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सरचिटणीस विशाल दरेकर यांच्या माध्यमातून फ्लेक्स उभारण्यात आले असून. “दुश्मनी जमकर करो… दुश्मनी जमकर करो… लेकिन यह एहसास रहे, जब दोस्त बनजाये तो शरमिंदा ना हो…” असा मजकूर फ्लेक्सवर छापण्यात आला आहे.
याबद्दल ‘पुणे लोकल’शी बोलताना विशाल दरेकर म्हणाले “आज प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनी गेली पाच वर्ष केवळ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करण्याचं काम केलं. आता राज्यामध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर केवळ आपली घरे वाचवण्यासाठी त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. आम्ही स्थानिक पातळीवर काम करत असताना अनेकदा विरोधाची भूमिका घेण्यात आली. कोरोनामध्ये आज प्रवेश केलेल्या स्थानिक नगरसेविकाच्या घराबाहेर आंदोलन केल्यानंतर आमच्यावर हात देखील उगारण्यात आले होते. प्रभागामध्ये त्यांनी स्वतः केलेली पाच कामे देखील सांगू शकत नाहीत.