विरेश आंधळकर : आपल्या नेत्यांना आमदार, खासदार करण्यासाठी घरचे खाऊन, लष्कराच्या भाकरी भाजण्याचं काम केलं तेच आता इतर पक्षातील नेत्यांना पायघड्या घालत असल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आपल्या भविष्याची धास्ती वाटू लागली आहे. याला कारण ठरतेय ते विधानसभेतील घवघवीत यशानंतर भाजपकडे येणाऱ्यांचा वाढलेला लोंढा. पुणे शहरात ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नगरसेवक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे लोकसभेतील पराभवानंतर निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रामध्ये सत्ता आली मात्र राज्यामध्ये खासदारांची संख्या एक आकडी झाली. पराभवाचा वचपा काढत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मायक्रो प्लॅनिंग करत न भूतो न भविष्यती असे यश प्राप्त केले आहे. अपेक्षेप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी वडगाव शेरीचा अपवाद सोडल्यास इतर सात मतदारसंघात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं. यामध्ये विशेषत: भाजपच्या काही जागा धोक्यात मानल्या जात असतानाही मोठ्या मताधिक्याने येथे पक्षाचे आमदार विजयी झाले. शहरात एक लोकसभा, एक राज्यसभा खासदार, सहा विधानसभा आणि एक विधानपरिषद आमदार आहेत. परंतु आता इतर पक्षांमधून होणारे इनकमिंग पाहून सामान्य भाजप कार्यकर्ते मात्र चांगलेच अस्वस्थ आहेत.
विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वांना वेद लागले आहेत ते महापालिका निवडणुकीचे. न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांवर सुनावणी होऊन लवकरच या निवडणुका जाहीर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे गेली तीन वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून असणारे माजी नगरसेवक आणि इच्छुक कामाला लागले आहेत. राज्यामध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपच्या पुन्हा एकदा पुणे महापालिकेत सत्ता मिळण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सद्या शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ हे केंद्रामध्ये राज्यमंत्री तर कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील राज्य सरकारमध्ये कॅबिनेट आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. सत्तेची सर्व प्रमुख केंद्र पक्षाकडे आल्याने सामान्य कार्यकर्त्यांना नगरसेवक होण्याची स्वप्न पडू लागली आहेत. आपले नेते खासदार, आमदार तसेच मंत्री झाले, त्यामुळे आता आपण किमान नगरसेवक होऊ ही अपेक्षा ठेवून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत आहेत.
2017 ला ज्या पद्धतीने भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं, ज्यामुळे अनेक निष्ठावंतांना घरी बसावं लागलं, त्याचीच पुनरावृत्ती आता देखील होऊ घातली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला रामराम करण्याच्या तयारीत असणाऱ्या अनेकांनी पक्षांतराला ब्रेक लावत भाजपमध्येच राहण्याची भूमिका घेतलीय. तर महाविकास आघाडीतील माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे साहजिकच पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत देखील ठाम राहणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण झाली आहे. पक्षनेतृत्वाने याची दखल घेण्याची गरज असून हीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात निष्ठावंत हा शब्द केवळ डिक्शनरीत वाचायला मिळेल, अशी भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांचा पाणी प्रश्न लवकरच मिटणार; मुरलीधर मोहोळांनी दिली महत्वाची माहिती
-पिझ्झा, बर्गर खाताय तर सावधान! पिझ्झामध्ये सापडला चाकूचा तुकडा
-वाल्मिक कराडसोबत व्हायरल फोटोवर सप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या ‘आमचे त्यांच्याशी संबंध…’
-संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोघांना बेड्या; आमदार रोहित पवार म्हणाले, ‘या महाराष्ट्रात…’