पुणे: विधानसभा निवडणुक पार पडल्यानंतर राज्यामध्ये महायुतीचे सरकार अस्तित्वात आले आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाल्यानंतर आता प्रशासनामध्ये देखील मोठे फेरबदल केले जात आहेत. पुणे जिल्हाधिकारी असणारे डॉ सुहास दिवसे यांची आज जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे या पदावर बदली करण्यात आली. तर साताऱ्याचे जिल्हाधिकारी असणारे जितेंद्र डुडी हे आता पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत.
2016 मधील बॅचचे आयएएस अधिकारी असणारे जितेंद्र डुडी हे मूळचे जयपूर (राजस्थान) येथील असून सुरुवातीला त्यांची झारखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त झाली होती. त्यांनी केंद्र शासनाकडे सहाय्यक सचिव म्हणून देखील काम केलं आहे. 2018 मध्ये केंद्र शासनाकडून महाराष्ट्र केडरकडे त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे प्रांताधिकारी म्हणूनही काम केले आहे.
विद्यमान जिल्हाधिकारी असणारे सुहास दिवसे यांची पदोन्नती करत जमाबंदी आयुक्त पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकार स्थापन होऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही अद्याप पालकमंत्री पदी कोण? हे निश्चित झालेले नाही. दुसरीकडे मात्र नवीन पालकमंत्री येण्यापूर्वीच प्रशासनामध्ये मोठे बदल केले जात आहेत.