पुणे : विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सपाटून पराभवाचा सामना करावा लागला आहे. तत्पूर्वी गेली अडीच वर्षांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनेक शिलेदारांनी साथ सोडली होती. आता हीच मालिका कायम असल्याचं दिसत असून पुण्यातील ठाकरे गटात असणारी नाराजी चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. हे सर्व नेते भाजपमध्ये प्रवेश करणारं असल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
काय म्हणाले विशाल धनवडे?
“काही निर्णय घेताना त्रास होतो तसा मला ही झाला आहे. मी कधी माझ्या स्वप्नात ही विचार केला नाही की माझी शिवसेना मला सोडावी लागेल, ज्या शिवसेनेवर मी एवढं प्रेम केले, ती वाढवण्यासाठी एवढे कष्ट घेतले, ज्या शिवसेनेने मला एवढे प्रेम दिले, नाव दिले, मोठे केले ती शिवसेना सोडताना खूप त्रास होतो आहे.”
“पुण्यातील शिवसेनेला कोणीही वाली नाही इथे जिल्ह्यात पक्षालाच शिवसेना नकोय असे वाटायला लागले आणि यातूनच घुसमट चालू झाली. ना पुण्यात लोकसभेला जागा, ना ही विधानसभेला. आणि जागा मिळाली तरीही त्या उमेदवाराच्या मागे कोणतीही ताकत द्यायची नाही कोणतीही रसद पुरवायची नाही. ना कोणत्या शिवसैनिकाला कसलीही मदत करायची नाही ना कोणत्या शिवसैनिकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचे नाही . पुण्यात शिवसेनेला कोणीही वाली नाही. ज्यांच्यात शिवसेना वाढवण्यासाठी काम करण्याची भूक आहे त्याला काम करू न देणे हे मागील ५ वर्षे झाले चालू आहे, पक्षातील जे नगरसेवक आहे ते वाढवायचे सोडून जे आहेत त्यांच्याच पायात पाय घालण्याचे काम चालू आहे. संपर्क प्रमुखांच्या कानावर यासर्व गोष्टी असून सुद्धा ते काहीही करू शकले नाहीत असे म्हण्यापेक्षा त्यांच्या हातात काहीही न्हवते असे आहे.”
बरीच कारणे आहेत परंतु आता कोणतीही कारणे न देता मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो आहे. पुढील काळात प्रभागासाठी आणि शहरासाठी खूप काही करायचे आहे. नक्कीच जे करू ते चांगले करू, असा विश्वास आहे, असं म्हणत विशाल धनवडे यांनी शिवसेनाला रामराम केला असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचंही सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
-वाल्मिक कराड शरण आल्यानंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया; ‘इथे सापडला की ठोकला’
-नववर्षाच्या स्वागतावेळी कर्तव्य बजावणाऱ्या पीएसआयचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
-पुण्याचे पालकमंत्री कोण? दत्तात्रय भरणे म्हणाले, ‘कोणी काहीही म्हणू..’
-दारू नको दूध प्या जीवनाचा आनंद घ्या, आमदार रासनेंच्या संकल्पनेतून भाजपचा अनोखा उपक्रम
-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष रेल्वे