पुणे : पुणे शहरात ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला गुड बाय आणि न्यु इयरच्या स्वागतासाठी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर मोठी गर्दी पहायला मिळते. त्यातच नववर्षाच्या स्वागतासाठी पब, बार पहाटे ५ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. अशातच मद्यपान करुन वाहने चालवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे अपघात वाहतूक कोंडी असे प्रकार दिसतात. या पार्श्वभूमीवर आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
३१ डिसेंबरला रात्रीपासून ते एक जानेवारीला पहाटेपर्यंत १ हजार ८१९ पोलीस तैनात असणार आहेत. नववर्षानिमित्त प्रार्थना स्थळे, मॉल, हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष गस्त घालण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करणार असून भरधाव वाहन चालवणाऱ्यांवर विशेष लक्ष असणार आहे. तसेच कर्कश हॉर्न वाजविणारे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ध्वनिप्रदूषण होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. रात्री बारानंतर ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हॉटेल, ढाबा, क्लब चालक-मालकांकडून नियमांचे पालन व्हावे, यासाठी पोलीस दलाने हॉटेल, ढाबा चालक-मालकांना सूचना दिल्या आहेत. मावळ तालुक्यातील पर्यटनच्या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तसेच वाहन चालकांची तपासणी केली जाणार आहे. वाहनातील प्रवाशांकडे मद्य बाळगण्याचा परवाना नसेल, तर वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. संबंधितांची ब्रेथ ॲनालायझर मशिनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. मद्यपान करून वाहन चालविल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पोलीस म्हणतात 31 डिसेंबरसाठी आम्हीही तयार, CCTV करणार लाईव्ह मॉनिटरिंग अन् मद्यपींवर…
-दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादांच्या आमदाराचे सूचक विधान