पुणे : गेल्या काही महिन्यांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातामुळे संपूर्ण शहरासह राज्याचं राजकारण आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. या अपघातामध्ये बड्या बिल्डरपुत्र अल्पवयीन आरोपीने दोन तरुण अभियंत्यांना आपल्या अलिशान कारने चिरडलं. ज्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांकडून आरोपीला वाचवण्याचे करण्यात आलेले प्रयत्न, अल्पवयीन मुलगा हा दारुच्या नशेत कार चालवत होता. त्याच्या रक्ताचे नमुने देखील ससून रुग्णालयात बदलण्यात आले. तसेच या सर्व प्रकरणात राजकीय हात असल्याचे देखील पहायला मिळाले, या सर्व प्रकारामुळे पोलीस प्रशासन, राजकीय टीका-टिपण्णी सर्व नाट्य पहायला मिळाले. मात्र, संपूर्ण प्रकरणावरुन महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी पुण्यातील एका पबवर टाकलेल्या धाडेची सर्वांनाच आठवण होते.
९० च्या दशकात महाराष्ट्रात पहिल्यांदाच भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन झालं होतं. या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाची धुरा हाती घेतली. याच काळात राज्याचा आकार बदलू लागला होता. मुंबईच्या ‘छम-छम’चा जोरदार आवाज पुणे शहरावर परिणाम करु लागला होता. पुण्यातही काही दक्षिणत्य उद्योजकांनी पब सुरू केले. मुंबईमध्ये छम छम आणि गँगवॉरचे झळ पुणे शहराला पोचायला सुरुवात झाली होती. अशातच पुण्यातील ‘टेन डाऊनिंग स्ट्रीट’ या पब मालकावर हफ्ता वसुलीच्या प्रकरणातून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या गोळीबारात तो मालक बचावला. ज्या पबमध्ये हा गोळीबार झाला त्याच पबमध्ये एका मोठ्या चिकन व्यावसायिकाचा मुलगाही पार्टीसाठी आला होता आणि तो देखील या गोळीबारात थोडक्यात बचावला. मुंबईमधलं गँगवॉर आणि टोळी युद्ध पुण्यात येऊन ठेपल्यामुळे हा पब मालक आपलं हॉटेल, बार आणि पब बंद करून कायमचाच बाहेर पडला.
९० च्या दशकात पुण्यातील सर्वात प्रसिद्ध असणाऱ्या ‘ब्लॅक कॅडिलॅक’ या पबमध्ये टोळी युद्धाचा दुसरा अध्याय सुरु झाला. नगर रस्त्यावरील रुबी हॉस्पिटल आणि जहांगीर हॉस्पिटलच्या जवळ असणारा ‘ब्लॅक कॅडिलॅक’ या पबचा मालक देखील दक्षिणात्य होता. नव्याने येऊ घातलेल्या पब संस्कृतीची आणि या पबची चर्चा कायमच होत होती. सांस्कृतिक शहर असणाऱ्या पुण्यामध्ये पबविरोधात काही सामाजिक संघटनांनी आवाद उठवला, आंदोलनं केली तरीही ही पब संस्कृती बंद झाली नाही. ‘ब्लॅक कॅडिलॅक’ नावाच्या पबची ख्याती थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पसरली होती. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री गोपीनाथ मुंडे एकदा पुणे दौऱ्यावर आले अन् त्यांना या पबविषयी माहिती समजली. मुंडेंना ही पब संस्कृती आजिबातच पटली नव्हती.
एका रात्री गोपीनाथ मुंडे आणि तात्कालाीन समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे हे या पब असणाऱ्या रस्त्याने घरी जाण्यासाठी निघाले होते. दिलीप कांबळे यांनी या पबचा विषय गोपीनाथ मुंडे यांना आधीच सांगितला होता. मुंडेंच्या डोक्यात हा पब पक्का बसला होता. त्यावेळी गोपीनाथ मुंडेंनी आपल्या ताफ्यातील ड्रायव्हरला ‘ब्लॅक कॅडिलॅक’ पबकडे इशारा केला अन् क्षणातच मुंडेच्या गाडीचा ताफा थेट या पबच्या आवारात घुसवला. काही वेळ पबचे कर्मचारी आणि मॅनेजर यांना काही समजलं नाही. पण गोपीनाथ मुंडेंचा दरारा असणारा आवाज बाहेर आला. ‘कोण आहे रे तिकडे..’ तेव्हा समजलं की, थेट महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीच आपल्या पबवर ‘रेड’ टाकली…
कालांतराने हा पब सुरू झाला, पण गोपीनाथ मुंडेंच्या या डॅशिंग कारवाईची पुणेकरांना आजही आठवण होते. सांस्कृित वारसा जपणाऱ्या शहरात पाश्चिमात्य पब संस्कृतीला आळा घालण्यासाठी पबवर रेड टाकत गोपीनाथ मुंडेंनी शहरातील नंगानाच बंद करण्याचं मोठं धाडस बेधडकपणे केल्याचं संपूर्ण राज्याने पाहिलं आहे. गोपीनाथ मुंडे यांची ख्याती ही डॅशिंग गृहमंत्री म्हणून होती बनली ती याच धाडीनंतर. मुंबईतील टोळी युद्धाचा आणि अंडरवर्ल्डचा खात्मा करणारा आणि गुन्हेगारांना ज्याच्या नावाने थरकाप होईल, असे गृहमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे उदयास आले होते.
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट
-भटक्या कुत्र्यांनी तब्बल १४ हजार पुणेकरांना घेतला चावा; पालिका प्रशासनावर नागिरकांची तीव्र नाराजी
-‘वेळ पडल्यास स्वबळावर लढणार’; शरद पवारांच्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
-विधानसभेनंतर लक्ष महापालिकेवर, ८ मतदारसंघात भाजपची सदस्य नोंदणी जोरात
-लोकसभा, विधानसभा झाली तरीही पवार विरुद्ध पवार सामना सुरुच; बारामतीत नेमकं काय घडतंय?