पुणे : पुणे शहरामध्ये गुन्हेगारी, चोरी, लूटमार, खून, दरोडा असे प्रकार दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. त्यातच सायबर चोरट्यांची देखील संख्या वाढताना दिसत आहे. अशातच आता कर्वेनगर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी मोठी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पुनर्विवाह करण्यासाठी इच्छूक असलेल्या ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली. ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाई करण्याची धमकी देऊन चोरट्यांनी त्यांच्याकडून तब्बल ७२ हजार रुपये उकळले आहेत. या प्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक कर्वेनगर भागात राहायला आहेत.
तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, मनीषा शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक घटस्फोटित आहेत. त्यांना पुनर्विवाह करण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी संकेतस्थळावर नोंदणी देखील केली होती. चोरट्यांनी त्यांना समाज माध्यमात एक फाॅर्म पाठविला. फाॅर्ममध्ये त्यांना वैयक्तिक माहिती भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मनीषा शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. शर्माने समाज माध्यमात अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तक्रारदाराला दिली. तसेच तिने बँक खात्यावर तातडीने पैसे भरण्यास सांगितले.
आरोपी शर्मा हिचा साथीदार विक्रम राठोडने त्यांच्याशी संपर्क साधला. दिल्ली पोलीस दलातून बोलत असल्याचे सांगून त्यांना गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर राहुल शर्माने देखील समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन त्यांना बँक खात्यात ७२ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. घाबरलेल्या ज्येष्ठाने त्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता रोकडे आता पुढील तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात १४ ते २२ डिसेंबर पुस्तक महोत्सव; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन
-सतीश वाघ हत्या प्रकरणी पोलिसांकडून चौघे ताब्यात; धक्कादायक माहिती आली समोर
-बांग्लादेशी रोहिंग्यानं पुण्यात घर घेऊन थाटला संसार; अवघ्या ५०० रुपयांत काढलं खोटं आधारकार्ड
-माय-लेकराच्या नात्याला काळिमा; थंडीच्या कडाक्यात नवजात बाळाला तोंडाला पिशवी बांधून रस्त्यावर फेकलं