पुणे: कसबा विधानसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवल्यानंतर आमदार हेमंत रासने यांनी कामाचा झपाटा लावला आहे. कचरामुक्त कसबा करण्याची घोषणा करत रासने यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या सोबतीने गेल्या आठवड्यात मतदारसंघात पाहणी केली. कचऱ्याच्या क्रॉनिक स्पॉटमुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता राहत असून दुर्गंधी पसरत असल्याचं पाहणीवेळी पुढे आलं होतं. यानंतर आता गंजपेठेतील ताडी गुत्ता आणि गुरुवार पेठेतील चांदतारा चौक परिसरातील क्रॉनिक स्पॉट बंद करत सकाळी आणि रात्री दोन वेळा कचऱ्याचे संकलन महापालिकेकडून करण्यात येत आहे. रासने यांच्याकडून राबवल्या जाणाऱ्या ‘कचरामुक्त कसबा‘ अभियानाची यामुळे यशस्वी सुरुवात झाली आहे.
भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ताडी गुत्ता, गंज पेठ तसेच गुरुवार पेठेतील चांदतारा चौक परिसर येथील असणारे क्रॉनिक स्पॉट बंद करण्यात आले आहेत. सदर परिसर कचरा मुक्त करून संपूर्ण परिसरातील नागरिकांचा तसेच व्यावसायिकांचा कचरा सकाळ व रात्र सत्रात मनपा व स्वच्छ सेवा सहकारी संस्था यांच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी वर्गीकृत करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील कचऱ्याचे ढीग हटल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. आमदार रासने यांनी पाहणी केल्यानंतर तात्काळ पालिकेकडून कार्यवाही करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
याबद्दल बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, “कसबा मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवत लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. मतदारसंघात अनेक ऐतिहासिक वास्तू असल्याने जगभरातील लोक येथे भेट देतात. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ असणे गरजेचे असल्याने कचरामुक्त कसबा अभियान राबवण्याचा आमचा संकल्प आहे. गेल्या आठवड्यात पाहणी करण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलत अनेक ठिकाणचे क्रॉनिक स्पॉट बंद करत दिवसातून दोन वेळा स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. याबद्दल महापालिका प्रशासनाचे नागरिकांचे वतीने आभार मानतो. नागरिकांनी देखील आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची काळजी घ्यावी, कचरामुक्ती सोबतच पिण्याच्या पाण्याची समस्या देखील लवकरच सोडवली जाईल”.