पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यात महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. आजवरच्या निवडणुकांचे सर्व रेकॉर्ड मोडित काढत भाजप महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. भाजपचे १३२, शिंदेंच्या शिवसेनेचे ५७ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेचे ४१ आमदार विजयी झाले आहेत. विधानसभा झाल्यानंतर आता गेली ३ वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नविन वर्षात फेब्रुवारी-एप्रिलच्या दरम्यान नगरपरिषद, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका पार पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे गेल्या ३ वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी नगरसेवकांना आता कामाला लागावे लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या ३० याचिकांवर एकत्रित निर्णय झाल्यास राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील, असा दावा केला जात आहे. २०१९ मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे तर पुढे ओबीसी आरक्षण, प्रभाग रचनेच्या प्रश्नावरुन महाविकास आघाडी आणि नंतर महायुती सरकारच्या काळात निवडणुका पुढे ढकलल्या. यासंदर्भात न्यायालयात वेगवेगळ्या याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. विधानसभेची निवडणूक झाल्याने आता पालिका निवडणूक घेण्याचा रेटा वाढताना दिसत आहे.
राज्य सरकारने २०२२ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असेलल्या पालिकेत सदस्य संख्या किमान १६१ तर कमाल १७५ पर्यंत असू शकते. हा निर्णय अद्याप कायम आहे. पुणे महापालिकेची २०११ च्या जनगणनेनुसार ३५ लाख ५६ हजार ८२४ इतकी लोकसंख्या आहे. त्यामुळे १६६ पर्यंत नगरसेवकांची संख्या जाणार आहे. सरकारच्या नवीन निर्णयानुसार ४ सदस्य असणारे ४० तर ३ सदस्यीय २ असे एकूण ४२ प्रभाग होऊ शकतात. परंतु नव्याने समाविष्ट झालेली फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे नुकतीच वगळण्यात आल्याने प्रभाग रचनेत फरक पडेल. सर्वोच्च न्यायालय आणि राज्यात येणारं नवीन सरकार काय निर्णय घेणार? यावर सर्वकाही निर्भर आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी? या ४ आमदारांची नावे चर्चेत
-विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर भाजपची सदस्यता नोंदणी अभियानाला प्रारंभ
-‘बारामतीचा एकच दादा’; अजितदादांनी शरद पवारांवर मात करत पुतण्याचा केला पराभव
-‘मी चॅलेंज देतो तू आमदारच कसा होतो तेच बघतो’; अजितदादांनी चॅलेंज पूर्ण केलं?