पुणे : आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. राज्यातील अनेक जागांवर निकाल जाहीर झाला असून पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी हा बालेकिल्ला कायम राखला आहे. २०१९ च्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील या मतदारसंघातून निवडून आले होते. या मतदारसंघातून पुन्हा एकदा महायुतीकडून चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवला आहे. चंद्रकांत पाटलांच्या विजयाचे बॅनर कोथरुड मतदारसंघात कालपासूनच झळकत आहेत.
आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली. चंद्रकांत पाटील हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. ही आघाडी त्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राखत दणदणीत विजय मिळवला आहे. पुण्यातील कोथरूड मतदारसंघात भाजचे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे तर मनसेचे किशोर शिंदे निवडणुकीच्या रिंगणार होते.
मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी २०१९ ला पाटील यांच्याविरोधात चांगली लढत दिली होती. मात्र, पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी आपला गड राखण्यात यश मिळवलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अंतिम निकाल आल्याशिवाय जल्लोष साजरा करू नये असं वरिष्ठांकडून निर्देश देण्यात आले आहेत. त्याचवेळी भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी मात्र जल्लोषाला सुरुवात केली आहे. चंद्रकांत पाटलांच्या कोथरुडमधील कार्यालयामध्ये २०० किलो लाडू आणण्यात आले आहेत.