पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांकडून ज्या-त्या मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. अशातच काही उमेदवारांना आचारसंहितेचे नियम देखील माहिती नसल्याचं आता समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्याकडून आचारसंहितेच्या नियमांचा भंग झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सुनील शेळके यांच्यासह दोघांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
रात्री दहा वाजल्यानंतर निवडणूक प्रचार रॅली काढून नियमाचा भंग केल्याप्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आढले खुर्द आणि चांदखेड येथे रात्री उशिरा काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीमुळे या तिघांवर नियम भंगाची कारवाई करण्यात आली आहे. दीपक भाऊराव राक्षे (वय ५३ रा. सोमाटणे फाटा ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आमदार सुनील शेळके (वय ४५) यांच्यासह नामदेव सावळे आणि राम दाभाडे (दोघे रा. तळेगाव दाभाडे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ नामदेव दाभाडे यांनी मंगळवारी (दि. ५) आढले खुर्द आणि चांदखेड या गावांमध्ये प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीसाठी मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियम व अटीनुसार प्रचार रॅलीला परवानगी दिली होती. ही रॅली रात्री दहा वाजल्यानंतर शिरगाव ते सोमाटणे यादरम्यान काढण्यात आली. रात्री दहानंतर प्रचारास बंदी असताना देखील ही रॅली काढण्यात आली असून रात्री पावणेबारा वाजेपर्यंत रॅली सुरू होती. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“राज ठाकरेंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका”; अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला
-“जनतेने दाखवलेला हा विश्वास मी निश्चितच माझ्या कार्यातून सार्थ ठरवीन”- हेमंत रासने
-अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेवर हर्षवर्धन पाटलांचं सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाले, ‘निकालातून..’
-लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी: १५०० नाही तर आता मिळणार २१०० रुपये
-‘विकास पाहिजे तर आबाच पाहीजे’ म्हणत आबा बागुलांच्या विकास यात्रेने पर्वती दुमदुमली