पुणे : विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस असून शेवटचे काही तासच बाकी आहेत. तोपर्यंत अनेक मतदारसंघातील बंडखोरांचे बंड थंड करण्याचे प्रयत्न पक्षाच्या वरिष्ठांकडून तसेच उमेदवारांकडून करण्यात येत आहे. काहींनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले तर काही जण आपल्या निर्णयावर ठाम आहेत. अशातच पर्वती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल यांनी देखील आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आबा बागुल यांच्या भेटीला पोहचले. शरद पवारांनी आबा बागुलांशी फोनवरुन चर्चा केली. शरद पवारांनी आबा बागुल यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती देखील केली मात्र, तरीही आबा बागुल निवडणूक लढण्यावर ठाम असून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
महाविकास आघाडीचं शिष्टमंडळासमोरच शरद पवार आणि आबा बागुल यांचे फोनवरुन संभाषण झाले. शरद पवारांनी विनंती करुनही बागुल आपल्या निर्णयावर ठाम आहेत. “मी भाजपचा पराभव करणारच. मला पुरस्कृत करावं.” अशी आबा बागुल यांनी थेट शरद पवारांकडेच मागणी केली आहे.
“गेल्या निवडणुकीत अश्विनी कदम म्हणाल्या होत्या, वडिलांनी मुलीसाठी थांबावं. तेव्हा मी लगेच माघार घेतली होती. आता या वयात मुलीने वडिलांना त्रास देऊ नये. तिने माघार घ्यावी”, असेही आबा बागुल म्हणाले असून अश्विनी कदम यांनी माघार घेण्याची विनंती केली आहे. पर्वतीमध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या अश्विनी कदम आणि अपक्ष आबा बागुल अशी लढत पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता पर्वतीत यंदा सांगली पॅटर्न पहायला मिळणार का? हे येत्या २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-इंदापूरात राजकीय घडामोडींना वेग! शरद पवारांनी घेतली भरत शहांची भेट, प्रवीण माने माघार घेणार?
-Assembly Election: बंडखोर झाले नॉटरिचेबल; कसब्यात धंगेकरांची धाकधूक वाढली
-‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ आबा बागुलांच्या समर्थनार्थ मतदारसंघात बॅनरबाजी
-नाना काटेंचं बंड शमवण्यासाठी अजित पवारांकडून शर्तीचे प्रयत्न; नाना काटे माघार घेणार का?
-“…त्याला उमेदवारी देताना स्वाभिमान कुठं ठेवला?”; विजय शिवतारेंचा अजितदादांना सवाल