पुणे : एकीकडे राज्यात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीचे पहायला आहे. पर्वती मतदारसंघात आता वेगळीच रंगत आल्याचे पहायला मिळत आहे. अपक्ष उमेदवार, माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या समर्थनार्थ पर्वती मतदारसंघात एक पोस्टर झळकत आहे. ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ अशा आशयाचे पोस्टर झळकत असून यावर #पर्वती विधानसभा मतदारसंघ असे देखील लिहले आहे.
पर्वतीमधून विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी प्रचंड आग्रह केला होता. आबा बागुल यांनी हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडावा, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचे अध्यक्ष शरद पवारांची दोनदा भेट घेतली. मात्र, तरीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आबा बागुलांनी अपक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आबा बागुल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता पर्वती मतदारसंघात ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ अशा आशयाचे पोस्टर्स झळकत आहेत. त्यामुळे पर्वती मतदारसंघात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पर्वती मतदारसंघामधून भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून अश्विनी कदम या निवडणुकीच्या रिंगणात असून अपक्ष निवडणूक लढणारे आबा बागुल देखील पर्वतीमधून निवडणूक लढत आहेत. माधुरी मिसाळ आणि अश्विनी कदम यांच्या पुन्हा एकदा सामना रंगत असून गेल्या विधानसभेत माधुरी मिसाळ यांनी कदमांचा पराभव केला. २०१९ च्या निवडणुकीतही आबा बागुल यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तेव्हाही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. यंदाही उमेदवारीचा आग्रह करुनही उमेदवारी न मिळाल्याने आबा बागुल यांनी बंडखोरी न करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदारसंघात आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय आहे सांगली पॅटर्न?
सांगली लोकसभा निवडणूक २०२४मध्ये सांगलीची जागा काँग्रेसला सोडावी आणि आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून विशाल पाटील यांनी आग्रह धरला होता. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढली. या निवडणुकीत महायुतीसह महाविकास आघाडीतील उमेदवाराचा पराभव करत विशाल पाटलांनी ५ लाख ७२ हजार ६६६ मतांनी विजय मिळवला. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात ‘सांगली पॅटर्न’ ची जोरदार चर्चा झाली असून अशीच काहीशी परिस्थिती आता पुण्यातील पर्वती मतदारसंघात पहायला मिळत आहे. त्यामुळे पर्वतीत सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नाना काटेंचं बंड शमवण्यासाठी अजित पवारांकडून शर्तीचे प्रयत्न; नाना काटे माघार घेणार का?
-“…त्याला उमेदवारी देताना स्वाभिमान कुठं ठेवला?”; विजय शिवतारेंचा अजितदादांना सवाल
-लोकसभेला रान उठवलं, पण आता अजितदादा घेणार बदला? पुरंदरच्या मैदानात शिवतारेंविरोधात उतरवला उमेदवार
-निवडणुकीच्या धामधुमीतही जपली परंपरा; आबा बागुलांकडून रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलांना अभ्यंगस्नान
-अपक्ष उमेदवारी तरीही रॅलीची सुरवात काँग्रेस भवनातूनच; बागुलांच्या रॅलीला उत्फुर्त प्रतिसाद