पुणे :अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघातून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदारसंघातून आज आठव्यांदा विधानसभेचा अर्ज भरला आहे. बारामतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काटेवाडी जवळील कन्हेरी गावातील मारुती मंदिरात आज अजित पवारांनी नारळ वाहिला आणि प्रचारसभेला सुरवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह बिग बॉस मराठी५ चा विजेता सुरज चव्हाण देखील उपस्थित होता. यावेळी प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली आहे.
“लोकसभेला माझं चुकलं, सुनेत्राला सुप्रियाच्या विरोधात मी उमेदवार नव्हतं द्यायला पाहिजे. इथं बसलेल्या लोकांनी सुप्रियाला मतदान केलं. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादाला. दादा म्हणजे हा दादा नाहीतर लोकांना वाटेल तो दादा. शिरुरला उभा राहा म्हणून सांगितले, बारामतीच्या लोकांनी त्यादिवशी जास्त आग्रह केला म्हणून आज मी उमेदवारी अर्ज भरल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. प्रत्येकाने आपापल्या गावात जा, दुसऱ्याच्या गावात जाऊ नका. आपापले घर सांभाळा मी तुम्हाला हे का सांगतोय कारण माझंच घर नीट नाही. म्हणून मला बोलताना भीती वाटते, तुम्ही तिकडे गेल्यावर मला त्रास होतोय.”
“आई सांगतेय माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका. तुटायला वेळ लागत नाही. मागे मी चूक केली, आता चूक कुणी केली? आता फॉर्म भरायला कोणी सांगितला? म्हणजे साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये. एकोपा रहायला पिढ्यानं पिढ्या जातात. तुटायला वेळ लागत नाही”, असे म्हणताना अजित पवारांना अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले आहेत.
दरम्यान, अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे बारामतीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच पवार काका-पुतण्यात सामना रंगणार आहे. त्यामुळे लोकसभेला नणंद भाऊजई आणि आता काका -पुतण्या या लढतीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बालवडकरांची तलवार म्यान! चंद्रकांत पाटलांना पाठिंबा दिला अन् पेढाही भरवला
-हेमंत रासनेंकडून ‘घर चलो अभियाना’ने प्रचाराला सुरवात; थेट घेतायेत जनतेच्या भेटीगाठी
-‘मॉर्निंग वॉक विथ आबा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद! तळजाई टेकडीवर आबा बागुल यांनी साधला मतदारांशी संवाद
-पाच हजार पुस्तके अन् लाखो वाचक! चंद्रकांत पाटलांच्या ‘फिरते वाचनालय’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद