पुणे: विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आपले दोन दिवस उरले आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीतील जागावाटपांचा तिढा जवळपास सुटल्याचं सांगितलं जात आहे. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार देखील घोषित केले असून खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सगळं ब्राह्मण समाजाकडून महायुतीने समाजातील उमेदवार देण्याची मागणी केली होती. याची चर्चा देखील पुणे शहरासह संपूर्ण राज्यभरात झाली. दरम्यान आता सकल ब्राह्मण समाजाच्या संघटनांनी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने ब्राह्मण समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे सकल ब्राह्मण समाजाने महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. ब्राह्मण संघटनांचे मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, समन्वयक चैतन्य जोशी, मयूरेश अरगडे यांनी शनिवारी ही माहिती दिली. राज्यातील विविध भागांतील मतदारसंघांमध्ये ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी ब्राह्मण संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. याचा भाजपसह महायुतीने सकारात्मक विचार केला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर), संजय केळकर (ठाणे), अतुल भातखळकर (कांदिवली), पराग अळवणी (विलेपार्ले), राजन नाईक (नालासोपारा), सुधीर गाडगीळ (सांगली), उदय सामंत (रत्नागिरी), किरण सामंत (राजापूर) या ब्राह्मण समाजातील उमेदवारांना निवडणूक लढण्याची संधी देण्यात आली आहे.
भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची खासदारकी तर राजेश पांडे यांना पक्षाचे राज्य महामंत्री केलं आहे. महायुतीने ब्राह्मण समाजाबद्दल दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत आपण पाठिंबा जाहीर करत असल्याचे भालचंद्र कुलकर्णी यांनी सांगितला आहे.