पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली. भाजपने कसब्यातून हेमंत रासने, खडकवासल्यातून भीमराव तापकीर आणि पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे यांच्या नावांची घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या उमेदवार यादीत खडकवासल्यातून सचिन दोडके, पिंपरीमधून सुलक्षणा शीलवंत, पर्वतीमधून अश्विनी कदम आणि जुन्नरमधून सत्यशील शेरकर यांच्या नावांची घोषणा केली आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांत राजकीय समीकरण बदललं असलं तरीही आताच्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात जुनाच सामना रंगणार आहे. कसब्यात गेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत रंगलेला सामना आता पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत पहायला मिळणार आहे. पोटनिवडणुकीत धंगेकरांच्या पॅटर्न चालला अन् भाजपच्या गडाला सुरुंग लागला. आता या कसबा निवडणुकीत धंगेकरांचा पॅटर्न पुन्हा चालणार की भाजपचं कमळ फुलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
खडकवासला मतदारसंघातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकाच दिवशी उमेदवार जाहीर केला. भाजपने विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सचिन दोडके यांना पुन्हा एकदा तापकीर यांच्या विरोधात खडवासल्याच्या मैदानात उतरवलं आहे.
२०१९ साली झालेल्या निवडणुकीत दोडकेंना विजयाची आशा असतानाच भाजपच्या तापकीरांचा निसटता विजय झाला. त्यानंतर आता भाजपने तापकीर यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. २०१९ साली तापकीरांना नाकीनऊ करुन सोडणाऱ्या दोडकेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता खडकवासल्यात तापकीर विरुद्ध दोडके या समान्यात काय रंगत पहायला मिळते हे औत्सुक्याचं आहे.
पर्वती मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर झाली तर आज राष्ट्रवादी काँग्रेसने माधुरी मिसाळांना आव्हान देण्यासाठी अश्विनी कदम यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं आहे. २०१९च्या विधानसभेत अश्विनी कदम यांनी माधुरी मिसाळ यांना टक्कर दिली होती. कदम यांना ६० हजार मते मिळाली तर मिसाळांनी ९७ हजार १२ मते मिळाली होती. कदमांचा पर्वतीमधून मोठा पराभव पत्कारावा लागला होता. मात्र, यंदा त्यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत पुन्हा एकदा संधी दिली आहे.
दरम्यान, कसबा, खडकवासला आणि पर्वती मतदारसंघात ‘पट नवा पण खेळाडू जुनेच’ असे सामने रंगणार आहेत. त्यामुळे आता या तिन्ही मैदानात कोण कोणाला चितपट करतंय आणि या सामन्यांमध्ये काय वेगळी रंगत येणार हे पाहणं ओत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले; खडकवासल्यातून सचिन दोडके तर पर्वतीतून कोण?
-महायुतीत चेतन तुपेंच्या उमेदवारीने हडपसरचं राजकारण तापलं; महाविकास आघाडीचं काय?
-पुण्यात ठाकरेसेनेला दुय्यम स्थान, निष्ठावंतांमध्ये नाराजीची लाट; हडपसर अन् कसब्यात बसणार फटका
-चंद्रकांत पाटलांकडून भेटीगाठींचा धडाका; प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकरांकडून कौतुक