इंदापूर : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. अशात पुणे जिल्ह्यातील सर्वात चर्चेचा मतदारसंघापैकी असणाऱ्या इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. महायुतीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि महाविकास आघाडीकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे.
दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. आधीपासूनच कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात या विधानसभेला पुन्हा एकदा सामान रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने राजकीय समीकरण बदललं आणि हे दोन्ही नेते महायुतीमध्ये एकत्र आले.
आज समस्त इंदापूरकरांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या खासदार मा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माझ्यावर प्रेम करणारे आपले कार्यकर्ते, नागरिक माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित… pic.twitter.com/5KScXVGsdz
— Harshvarrdhan Patil (@Harshvardhanji) October 24, 2024
इंदापूरमधून लढण्यासाठी आधीपासून इच्छुक असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि पाटलांना इंदापूरमधून उमेदवारी देखील मिळाली. आज हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरात जोरदार शक्तीप्रदर्शन करत खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तसेच राष्ट्रवादीकडून (शरद पवार) उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या सोनाई दूध संघाचे प्रवीण माने हे हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे तसेच उमेदवारीवरुन नाराज होते. त्यांच्या नाराजीवर पक्षाकडून कोणतीही भूमिका घेण्यात आली नसल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत इंदापूर विधानसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मानेंच्या उमेदवारीमुळे हर्षवर्धन पाटलांच्या मताधिक्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शरद पवार त्यांची समजूत काढणार का? प्रवीण माने आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का? की हर्षवर्धन पाटलांना टक्कर देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळात राजकारण तापलं; भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक राजकीय उलथापालथ
-मावळात शेळकेंची डोकेदुखी वाढली; बापू भेगडे अपक्ष निवडणूक लढणार, बाळा भेगडेंचा पाठिंबा कोणाला?
-Ambegaon: ‘वळसे पाटलांमुळे माझं जगणं कठीण झालंय’ उमेदवारी अर्ज भरण्याआधी आंबेगावात राजकीय राडा
-पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरेना! इच्छुकांचा जीव टांगणीला
-बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार; अजित दादांसमोर पुतण्याच थोपटणार दंड?