पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवार निश्चितीसाठी सर्व पक्षांची लगबग सुरु आहे. २ दिवसांपूर्वी कसबा मतदारसंघात महायुतीमध्ये ब्राह्मण नेत्याला उमेदवारी द्या, अशी मागणी करण्यात येत होती. त्यातच काँग्रेसमध्येही मुस्लिम नेते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. कसबा मतदारसंघात विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत.
अशातच कसब्यातून मुस्लिम समाजाला संधी देण्यात यावी, अशी आग्रही भूमिका मुस्लिम समाजाकडून घेण्यात आली आहे. जेष्ठ नेते मुख्तार शेख यांना उमेदवारीची मागणी करत काँग्रेस प्रभारी रमेश चैन्नीथला यांची आज मुंबईमध्ये मुस्लिम कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करू, असे रमेश चेन्निथला यांनी सांगितले आहे.
“गेल्या 40 वर्षांपासून मी काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. आत्तापर्यंत काँग्रेसने जी जबाबदारी दिली समर्थपणे पार पाडली आहे. मी आणि मुस्लिम समाज नेहमीच काँग्रेससोबत राहिलो आहोत. आता या निवडणुकीत आम्हाला प्रतिनिधित्व मिळायला हवं. मला कसबा विधानसभा मतदारसंघातील अनेक नागरिक भेटायला आले. नागरिकांना विद्यमान आमदार भेटत नसल्याची तक्रार त्यांनी केली. त्यानंतर या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची भावना मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली असून मला उमेदवारी मिळावी, यासाठी राहुल गांधी यांच्यापासून नाना पटोले यांच्यापर्यंत सगळ्यांच्याच कानावर ही बाब मी घातली आहे”, असे काँग्रेसचे जेष्ठ नेते मुख्तार शेख म्हणाले आहेत.
कसब्यातील उमेदवारी संदर्भात आम्ही शरद पवार यांना देखील भेटलो त्यावेळी शरद पवार यांनी मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला खूप मदत केल्याची भावना बोलून दाखवली असून मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळायला हवं असं म्हटलं आमच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मी तुमच्याबद्दल बोलेल असं आश्वासन शरद पवार यांनी आम्हाला दिले आहे’, असेही मुख्तार शेख म्हणाले आहेत. मुख्तार शेख यांच्या मागणीमुळे आता कसब्यातून धंगेकरांची डोकेदुखी वाढल्याचे पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच मराठी चेहरा; विजया रहाटकर यांची नियुक्ती
-Assembly Election: खडकवासल्याच्या राजकारणात नवी खेळी; अजितदादांच्या शिलेदाराने थोपटले दंड
-काँग्रेसला जिंकायचाय पारंपारिक मतदारसंघ, पण अंतर्गत वादाचा होणार भाजपला फायदा?
-भावी अधिकाऱ्यांच्या स्वप्नांची राख; अभ्यासिकेला आग, विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले
-अजितदादांच्या शिलेदाराचा ठाकरे सेनेत प्रवेश; चिंचवड विधानसभेचं गणित बदलणार?